गगनगिरी महाराज सप्ताहासाठी निळवंडे कालव्यातून म्हाळुंगीत पाणी सुटले!

संगमनेर Live
0
गगनगिरी महाराज सप्ताहासाठी निळवंडे कालव्यातून म्हाळुंगीत पाणी सुटले!

◻️ आमदार अमोल खताळ यांच्या ​पालकमंत्र्याकडील पाठपुराव्याला यश

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे आयोजित प. पू. स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहासाठी पिण्याच्या व वापराच्या पाण्याची समस्या आता मार्गी लागली आहे. आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या तातडीच्या पाठपुराव्यामुळे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशांमुळे निळवंडे डाव्या कालव्यातून शनिवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आले. या निर्णयामुळे गुंजाळवाडीसह परिसरातील शेतकरी आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

​गुंजाळवाडी येथे अधिक मासानिमित्त ९ जून ते १५ जून या कालावधीत प. पू. स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनासाठी आणि श्रवणासाठी उपस्थित राहणार आहेत. एवढ्या मोठ्या जनसमुदायासाठी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी पाण्याची मोठी गरज निर्माण झाली होती. ही निकड ओळखून ग्रामस्थांनी म्हाळुंगी नदीवरील केटी वेअरमध्ये पाणी सोडण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती.

​ग्रामस्थांची मागणी मिळताच आमदार अमोल खताळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला. सप्ताहाचे धार्मिक महत्त्व आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार कालव्याचे पाणी म्हाळुंगी नदीपात्रात पोहोचले असून केटी वेअर आता भरले जाणार आहे.

दरम्यान, ​पाणी सुटल्यामुळे केवळ धार्मिक कार्याची अडचण दूर झाली नाही, तर गुंजाळवाडी, वेल्हाळे आणि राजापूर परिसरातील शेतीसाठीही याचा मोठा दिलासा मिळाला आहे. ऐन उन्हाळ्यात आणि धार्मिक उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मिळालेल्या या प्रतिसादामुळे ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !