अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करा!
◻️ कॉम्रेड डॉ. अजित नवले यांची सरकारकडे मागणी
संगमनेर LIVE (शिर्डी) | देशात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे महागाईचा प्रचंड भडका उडाला असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे सामान्य माणसाला रोजचे जीवन जगणे आता दुरापास्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडक टीका करत ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
सध्या पेट्रोल व डिझेलच्या दरात ३ रुपये, तर सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ झाली असली, तरी हे संकट एवढ्यावरच थांबणारे नाही. येत्या काळात ही वाढ १४ ते १७ रुपयांपर्यत जाण्याची भीती व्यक्त केली जात असून देशाच्या इंधन सुरक्षेबाबतही भीषण वास्तव समोर आले आहे. देशात सध्या केवळ ५१ दशलक्ष बॅरल तेल साठा शिल्लक असून भारताची रोजची गरज लक्षात घेता हा साठा फक्त १८ दिवसच पुरेल अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकेची परवानगी घ्यावी लागत असल्याबद्दल डॉ. नवले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारत हा एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश असताना आपल्या देशाला तेल कोठून खरेदी करावे यासाठी दुसऱ्या देशाची परवानगी घ्यावी लागणे ही अत्यंत क्लेशदायक आणि अपमानजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतासारख्या स्वाभिमानी देशाला कोणत्या कारणांमुळे अमेरिकेसमोर असे गलितगात्र व्हावे लागले आहे, याचे उत्तर सरकारने देशवासियांना देणे आवश्यक आहे. सरकारच्या वतीने पेट्रोलवर ३६ रुपये आणि डिझेलवर २८.५० रुपये इतका प्रचंड कर व कमिशन लावले जात आहे. केवळ काटकसर करण्याचे आवाहन करून ही परिस्थिती सुधारणार नाही, तर सरकारने हे कर आणि कमिशनचे दर तातडीने कमी करून जनतेला दिलासा द्यायला हवा.
डॉ. अजित नवले यांनी सरकारकडे मागण्या करताना स्पष्ट केले की, भारताने आता अमेरिकेचा दबाव पूर्णपणे झुगारून द्यावा. रशियासह जगभरातून जिथे कुठे स्वस्त आणि पुरेसे इंधन उपलब्ध होईल, तिथून ते त्वरित आयात केले पाहिजे. तसेच भविष्यातील संकट टाळण्यासाठी देशांतर्गत व्यूव्हात्मक पेट्रोलियम साठा पुरेशा प्रमाणात वाढवणे काळाची गरज आहे. सरकारने तात्काळ कर सवलत देऊन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रित कराव्यात आणि महागाई काबूत ठेवण्यासाठी युध्द पातळीवर ठोस पावले टाकावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.