शनिशिंगणापूर येथे ‘शनिजयंती’निमित्त ८ लाख भाविकांनी घेतले दर्शन!

संगमनेर Live
0
शनिशिंगणापूर येथे ‘शनिजयंती'निमित्त ८ लाख भाविकांनी घेतले दर्शन!

​◻️ कडक ऊन्हात भाविकांसाठी ‘मॉक कारंज्यांचा’ गारवा

संगमनेर LIVE (​नेवासा) | शनिवारी (दि. १६) शनि जयंती आणि शनि अमावास्येचा दुर्मिळ योग २०१३ नंतर तब्बल १३ वर्षानी जुळून आल्याने, प्रसिध्द तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे भक्तीचा जनसागर लोटला होता. दिवसभरात सुमारे ८ लाख भाविकांनी चौथऱ्यावर नतमस्तक होऊन शनिदर्शन घेतले. 

विशेष म्हणजे, देवस्थान ट्रस्ट बरखास्त झाल्यानंतर ६३ वर्षात प्रथमच शासकीय पातळीवर या यात्रेचे अत्यंत चोख नियोजन करण्यात आले होते. शनिवारी पहाटे ५ वाजून ११ मिनिटांनी अमावास्येला सुरुवात झाली असली, तरी भाविकांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटे ४:३० वाजता माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि मान्यवरांच्या हस्ते 'प्रांत:आरती'ने उत्सवाचा प्रारंभ झाला. त्यानंतर दुपारची आणि सायंकाळची आरती विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योगपती आणि कावडीधारकांच्या हस्ते संपन्न झाली.

रणरणत्या उन्हाचा त्रास भाविकांना होऊ नये यासाठी प्रशासनाने मंदिरात जागोजागी ‘तुषार कारंजे’ लावले होते, ज्यामुळे भाविकांना कडक उन्हातही गारवा अनुभवता आला. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः मंदिर परिसरातील कचरा आणि बाटल्या उचलून स्वच्छतेचा नवा आदर्श घालून दिला, तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सुरक्षा व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवले. हरियाणा, दिल्ली आणि शिरसा येथील शनिभक्तांनी दिवसभर मोठ्या प्रमाणावर अन्नदान सेवा केल्याने भाविकांची जेवणाची गैरसोय झाली नाही. तसेच, प्रशासनाने प्रथमच स्थानिक जमीन मालकांशी समन्वय साधून मोफत वाहनतळ, पिण्याचे पाणी आणि विश्रांती कक्षांची चोख व्यवस्था केली होती.

​या सोहळ्यासाठी आमदार आनंदराव पाटील भोंढारकर, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, बाबाजी काळे, माजी मंत्री शंकरराव गडाख आणि सुनील गडाख यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून दर्शन घेतले. झिम्बाब्वेचे उद्योगपती जयेश शहा व मुंबईचे व्यापारी श्री. सोनी यांच्या वतीने ‘विश्‍वशांती यज्ञाचे' आयोजन करण्यात आले होते. परंपरेनुसार, काशी आणि प्रवरासंगम येथून पायी आणलेल्या कावडीचे जल शनि चौथऱ्यावर अर्पण करण्यात आले. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने दिवसभर भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष सेवा दिली.

यावेळी भुयारी दर्शन मार्गातून जात असताना पुण्यातील भाविक अतुल धोत्रे यांना कडक उन्हामुळे चक्कर आली. प्रशासनाने प्रसंगावधान राखून त्यांना तातडीने उपचार केंद्रात दाखल केले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, ​कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य यात्रेचे यशस्वी नियोजन झाले. जनसंपर्क कार्यालयात येणाऱ्या भाविकांचे स्वागत अधिकारी अनिल दरंदले आणि पोलीस पाटील सयाराम बानकर यांनी केले. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !