रविवारी संगमनेर येथे महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक
◻️ पालकमंत्र्याच्या उपस्थितीत विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन
संगमनेर LIVE | संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वागीण विकासाला गती देण्यासाठी आणि आगामी रणनीती आखण्यासाठी उद्या, रविवार दि. १७ रोजी महायुतीच्या वतीने भव्य आढावा बैठक आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहे.
या दौऱ्याची सुरुवात सकाळी ११ वाजता मालपाणी लॉन्स येथे आयोजित महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीने होईल. या बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता धांदरफळ खुर्द येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द या ६ कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल. याच वेळी धांदरफळ खुर्द, जवळे कडलग आणि राजापूर या गावांसाठी महावितरणमार्फत सुमारे २ कोटी २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ५ केव्ही ते १० केव्ही क्षमतेच्या वीज रोहित्रांच्या कामांचे लोकार्पणही संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सायंकाळी ५ वाजता पारेगाव बु।। येथे महावितरण कंपनीच्या ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, तर त्यानंतर तळेगाव दिघे येथे अशाच प्रकारच्या ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण करून तो जनतेसाठी खुला केला जाईल. या सर्व प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील वीज समस्या सुटण्यास मदत होणार असून रस्ते विकासामुळे दळणवळण अधिक सुलभ होईल.
दरम्यान, या ऐतिहासिक विकास सोहळ्याला आणि मेळाव्याला संगमनेर मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.