डॉ. सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द पाळला!

संगमनेर Live
0

डॉ. सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द पाळला!

◻️ साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाशांचा ७/१२ चा मार्ग मोकळा

संगमनेर LIVE (​राहाता) | “निवडणुकीच्या काळात साकुरी येथील गोदावरी वसाहतीतील रहिवाशांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता झाली असून, आता या रहिवाशांचे नाव सातबारा उताऱ्यावर येईल,” असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. राहाता बाजार समितीत आयोजित बैठकीत त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली.

​साकुरी येथील गोदावरी वसाहत आणि राहाता येथील ३४० क्रमांकाच्या जागेबाबत अनेक वर्षापासून कायदेशीर गुंतागुंत होती. जागा वनविभागाची असल्याचा संशय आणि ‘सरकार’ असे सातबारा उताऱ्यावर असलेले नाव यामुळे रहिवासी चिंतेत होते. मात्र, डॉ. विखे पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर विशेष पाठपुरावा करून या जागेचा सातबारा ‘महाराष्ट्र शासन' असा करून घेतला, ज्यामुळे आता ही जागा स्थानिक रहिवाशांच्या नावावर करण्यासाठीचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे.

​याप्रसंगी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “मी राजकारणात वैभव आणि ऐश्‍वर्य कमावले असेल, पण लोकांचा विश्‍वास ही माझी खरी कमाई आहे. निवडणुकीत दिलेला शब्द पाळल्याचे समाधान मोठे आहे. शिर्डीतील लक्ष्मीनगरचा प्रश्नही आपण अशाच प्रकारे मार्गी लावला होता. आता साकुरीतील प्रत्येक रहिवाशाच्या नावावर सुमारे २५ लाख रुपये किमतीची जागा होणार आहे.”

​त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाल्याचे नमूद केले.

​मतदारसंघात गुन्हेगारीला कोणताही थारा देणार नाही, असा स्पष्ट इशाराही डॉ. विखे पाटील यांनी दिला. “मुलींची छेड काढणाऱ्या गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यास मी मागे-पुढे पाहणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बजावले.

मतभेद विसरून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानेच साकुरीत ५ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान ​या निर्णयामुळे साकुरीतील गोदावरी वसाहतीतील शेकडो कुटुंबांचा अनेक वर्षांचा संघर्ष अखेर संपुष्टात येणार आहे.

दरम्यान, यावेळी ज्ञानेश्‍वर गोंदकर, मुकुंदराव सदाफळ, मोहन सदाफळ, संजू सदाफळ, डॉ. स्वाधीन गाडेकर, विजय सदाफळ, कैलास सदाफळ, मुन्ना शहा, राजेंद्र निकाळे, सुधाकर दंडवते, कानिफ बावके, संदिप दंडवते, भारत बनसोडे, सचिन बनसोडे, शिवाजी नजन, सतिश बावके, विकास बावके, हरिश श्रीखडे, रमेश गायकवाड, पप्पू बनसोडे, बबन बनसोडे, अक्षय रोहोम, बाबासाहेब डांगे, रावसाहेब बनसोडे, पुंडलिक बावके, नंदा माळी, चंद्रकांत बनसोडे, बाळू जाधव, सुनील लोखंडे, दीपक शिंदे, दीपक दंडवते, शहा, किशोर दंडवते आदी यावेळी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !