संगमनेरचा पाणी आणि वीजेचा प्रश्न थेट जिल्हाधिकारी दालनात पोहचला

संगमनेर Live
0
संगमनेरचा पाणी आणि वीजेचा प्रश्न थेट जिल्हाधिकारी दालनात पोहचला

◻️ ​हक्काचे पाणी आणि वीज मागणीसाठी प्रशासनाला कार्यकर्त्यानी दिले निवेदन

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुका हा पर्जन्यछायेचा आणि अतिदुष्काळी भाग असतानाही, मागील काही दिवसांपासून राजकीय हेतूने येथील जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप होत आहे. हक्काचे पाणी आणि रोटेशन काळात ११ तास वीज मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यानी अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले.

​ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली १९८९ मध्ये झालेल्या संघर्षानंतर संगमनेर तालुक्याला ३० टक्के पाणी हक्काने मिळाले होते. २०१० मधील आदेशानुसार, रोटेशन काळात ११ तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा करणे बंधनकारक असतानाही, मागील दोन वर्षापासून वीज वितरण विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठका नियमित होत नसल्याने आणि पाटबंधारे विभाग राजकीय दबावाखाली काम करत असल्याने संगमनेरचा शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

​शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये भंडारदरा धरणाच्या रोटेशन काळात ११ तास पूर्ण दाबाने वीज मिळावी आणि संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. तसेच, कालवा सल्लागार समितीच्या बैठका नियमितपणे घेतल्या जाव्यात आणि निळवंडेच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना भंडारदरा व निळवंडे धरणाच्या हक्काच्या शिल्लक राहिलेल्या पाण्यातून पाणी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पिक विमा भरूनही त्यांना शून्य टक्के विमा मिळाला आहे, जो मोठा अन्याय असून सर्व बाधित शेतकऱ्यांना तातडीने पिक विमा मिळावा, अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

​यावेळी बाबा ओहोळ आणि पांडुरंग घुले यांनी वस्तुस्थिती मांडली. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सर्व कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसेच, वीज वितरण विभागाच्या मुख्य अधीक्षक अभियंत्यांनीही शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि पशुधनाचे हाल यामुळे संगमनेरमध्ये असंतोष खदखदत आहे. या प्रश्नावर तातडीने मार्ग न निघाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !