संगमनेरच्या आरटीओ कॅम्पवर आमदार अमोल खताळ यांची ‘सरप्राईज व्हिजिट’

संगमनेर Live
0
संगमनेरच्या आरटीओ कॅम्पवर आमदार अमोल खताळ यांची ‘सरप्राईज व्हिजिट’

​◻️ नागरिकांची अडवणूक करु नका; अधिकाऱ्यांना आमदारांनी सुनावले

​संगमनेर LIVE | ​संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग, श्रीरामपूर यांच्या वतीने आयोजित वाहन परवाना (लायसन्स) कॅम्पमध्ये सर्वसामान्य वाहनचालकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी अचानक धाड टाकली. या कारवाईमुळे आरटीओ कार्यालयाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, एजंटांच्या माध्यमातून सुरू असलेला गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे.

वडगाव पान येथे दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी विशेष कॅम्प आयोजित केला जातो. मात्र, या कॅम्पमध्ये अनेक एजंट सक्रिय असून ते वाहनचालकांकडून अवाजवी पैसे उकळत असल्याचे समोर आले होते. या संदर्भात अनेक वाहनचालकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी सोडण्याच्या कार्यक्रमावरून परतत असताना, आमदार खताळ यांनी कोणत्याही पूर्वसूचना न देता या कॅम्पला भेट दिली.

अचानक आमदार खताळ यांना कॅम्पमध्ये पाहून उपस्थित आरटीओ अधिकाऱ्यांची धांदल उडाली. आमदार खताळ यांनी परिस्थितीची पाहणी करत, संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “शासनाच्या सेवांसाठी नागरिकांना एजंटांच्या दारात जावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सर्वसामान्य वाहनचालकांची अडवणूक आणि आर्थिक लूट तत्काळ थांबली पाहिजे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये,” असे सक्त निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेचे वाहनचालकांकडून स्वागत होत आहे.

यावेळी आमदार अमोल खताळ यांनी थेट कॅम्पच्या ठिकाणाहून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संगमनेर येथे स्वतंत्र परिवहन कार्यालय सुरू करण्याची विनंतीही मंत्र्यांकडे केली. तक्रारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन परिवहन मंत्र्यांनी दिले आहे.

दरम्यान, ​आमदार खताळ यांच्या या ‘सरप्राईज व्हिजिट’ नंतर तरी, आरटीओ कार्यालयातील एजंटगिरीवर अंकुश लागेल का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !