तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने २१ गावांना दिलासा!
◻️ जलसंपदा मंत्री आणि आमदार खताळ यांच्यामुळे रखडलेला प्रश्न लागला मार्गी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील तळेगाव आणि परिसरातील २१ गावांच्या पाणीटंचाईवर अखेर कायमस्वरूपी मात करण्यासाठी महत्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. अनेक वर्षापासून तांत्रिक अडचणी, ठेकेदार आणि राजकीय अनास्थेमुळे रखडलेली ‘तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना’ आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. प्रवरा नदीचे पाणी वडगाव पान येथील साठवण तलावात सोडण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ही योजना बंद असल्यामुळे तळेगावसह २१ गावातील ग्रामस्थ, विशेषतः महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. या योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचारामुळे आणि देखभालीच्या अभावामुळे ही जीवनदायिनी योजना मृतप्राय झाली होती. मात्र, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या विशेष सूचना आणि आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली. अखेर सर्व तांत्रिक अडथळे दूर करून वडगाव पान आणि तीगाव माथ्यावरील जलकुंभांमध्ये पाणी पोहोचवण्यास प्रशासनाला यश आले.
आमदार अमोल खताळ यांनी महायुती सरकारच्या कार्यकर्त्यासमवेत वडगाव पान येथे जलपूजन करून पंप हाऊसचे बटण दाबून पाणी सोडले. यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, “या भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी परवड आम्हाला पाहावत नव्हती. काही लोकांनी केवळ राजकारण करून योजनेत अडथळे आणले, परंतु महायुती सरकार हे पाणी देणारे सरकार असून आम्ही दिलेला शब्द पूर्ण केला आहे.”
या योजनेच्या मागील काळातील कारभारावर आमदार खताळ यांनी जोरदार टीका केली. मागील काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जुनी समिती यापूर्वीच बरखास्त केली असून लवकरच नवी सक्षम समिती नियुक्त केली जाणार आहे.
योजना बंद राहण्यामागे वीज बिल थकल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. या थकीत वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून विधानसभेतही आपण आवाज उठवला आहे, असे आमदार खताळ यांनी सांगितले. आता ही योजना नियमित सुरू राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आमदार खताळ यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, “गेल्या चाळीस वर्षात सत्तेत असूनही ज्यांना पाणी देता आले नाही, त्यांनी आता टेस्टिंगच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण आता या भागाला शाश्वत पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”