उध्दव महाराज मंडलिक यांचा निळवंडे पाट पाणी कृती समितीकडून गौरव!
◻️ शेतकरी व्यथा आणि समाज प्रबोधनातून सरकारचे वेधले लक्ष
संगमनेर LIVE | सध्याच्या महागाईच्या काळात शेतकरी आणि कष्टकरी वर्ग नैसर्गिक संकटांसह आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. या भीषण परिस्थितीला आपल्या कीर्तनातून वाचा फोडून, समाज प्रबोधनाद्वारे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) करत आहेत. त्यांच्या या समाजोपयोगी आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव करत ‘निळवंडे पाट पाणी कृती समिती’च्या वतीने त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
ह.भ.प. उध्दव महाराज मंडलिक हे केवळ कीर्तन करत नाहीत, तर ते संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा चालवत आहेत. आपल्या ओजस्वी वाणीतून ते शेतकरी, कामगार आणि तरुणांच्या वेदना समाजासमोर मांडत आहेत. त्यांच्या कीर्तनामध्ये विज्ञाननिष्ठ आणि शास्त्रोक्त दृष्टिकोनाचा अंगीकार करून अंधश्रध्दा आणि अनिष्ट रूढींचे निर्मूलन करण्यावर भर दिला जातो.
निळवंडे पाट पाणी कृती समिती (नगर व नाशिक) यांनी या सत्कार प्रसंगी महाराजांना अभिनंदन पत्र देऊन गौरविले. या पत्रात समितीने म्हटले आहे की, महाराजांच्या कीर्तनसेवेमुळे समाजातील विविध घटकांना बळ मिळत असून, त्यांच्या ज्वलंत मांडणीमुळे सरकारला शेतकरी प्रश्नांची दखल घेणे भाग पडत आहे. अशा लोकहितकारक कार्याबद्दल निळवंडे लाभधारक शेतकरी आणि समितीच्या सदस्यांना महाराजांचा सार्थ अभिमान वाटतो.
दरम्यान, याप्रसंगी समितीचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, ज्येष्ठ मार्गदर्शक गायकवाड गुरुजी, सदस्य विलासराव गुळवे, विजय मगर यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.