विधान परिषद निवडणूकीसाठी १८ जून ला मतदान तर, २२ जून ला मतमोजणी

संगमनेर Live
0
विधान परिषद निवडणूकीसाठी १८ जून ला मतदान तर, २२ जून ला मतमोजणी

◻️ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पत्रकार परिषदेत माहिती 

संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून, अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता अधिकृतपणे लागू झाली आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४६१ लोकप्रतिनिधींच्या मतदानातून या मतदारसंघाचा कौल ठरणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

​निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार, २५ मे २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांना १ जून २०२६ पर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येतील, तर २ जून रोजी अर्जाची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ जून २०२६ ही अंतिम मुदत असून, १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर २२ जून रोजी मतमोजणी होऊन २५ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

​नामनिर्देशन प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर, जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पार पडेल. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे नाव महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात असणे अनिवार्य आहे. मतदानासाठी पसंती क्रमाची पध्दत वापरली जाणार असून, यासाठी जम्बो बॅलेट बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत अहिल्यानगर महानगरपालिकासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील एकूण ४६१ सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

​निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट १९९५' नुसार सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स किंवा झेंडे लावण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिला आहे. तसेच, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक सोयीसुविधांची तयारी केली असून, लोकशाहीचा हा उत्सव निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !