सुजय विखे-संग्राम जगताप या ‘जय-वीरू’च्या जोडीचा पुन्हा ‘मास्टरस्ट्रोक’
◻️ विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; प्राजक्त तनपुरे झाले जिल्ह्याचे १८ वे आमदार
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाने अत्यंत प्रभावी खेळी करत, ही जागा बिनविरोध करून दाखवली आहे. भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याने, अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या वाढत्या राजकीय प्रभावावर आणि संघटनात्मक कौशल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काॅग्रेस किंवा राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या वतीने उमेदवार दिला जाईल, अशी दाट शक्यता होती. मात्र, अंतिम क्षणापर्यत महाविकास आघाडीने आपला एकही अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवला नाही. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यत काही अपक्ष आणि स्थानिक उमेदवार रिंगणात होते, परंतु भाजपच्या चाणाक्ष खेळीपुढे त्यांना माघार घ्यावी लागली.
प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीमागे डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यातील समन्वयाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली. शेवटच्या काही मिनिटांत निर्माण झालेला तणाव आणि उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी या जोडीने दाखवलेली तत्परता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या या समन्वय कौशल्याची तुलना आता स्थानिक पातळीवर ‘जय-वीरू’ जोडीशी केली जात आहे.
गेल्या चार दिवसांपासून डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पडद्यामागून हालचाली केल्या, ज्याचे फलित म्हणजे हा बिनविरोध विजय मानला जात आहे.
दरम्यान, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे हे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील १८ वे आमदार ठरले आहेत. या विजयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपला एक भक्कम आत्मविश्वास मिळाला असून, जिल्ह्यातील राजकारणात पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.