तुकाराम मुंढेच्या आदेशानंतर नगरमध्ये अन्न भेसळविरोधी मोठी कारवाई
◻️ राहुरी आणि नेवासा तालुक्यांतून २.८४ लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त केले आहे. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार आणि सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत राहुरी आणि नेवासा तालुक्यांत मोठी कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान, राहुरी येथील ‘शिवशक्ती आईस्क्रीम' या आस्थापनाची तपासणी केली असता, तेथील शिवशक्ती ब्रॅडच्या आईस्क्रीम गुलकंद आणि अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने संशयास्पद आढळले. सदर उत्पादने दर्जाहीन असल्याच्या संशयावरून प्रशासनाने ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ आईस्क्रीम पॅकेट्स जप्त केले आहेत. त्याचप्रमाणे, नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील ‘संतोष किराणा स्टोअर्स'ची तपासणी केली असता, तेथे एसबीजी ब्रॅडच्या रिफाइंड पामोलीन ऑईलचा साठा संशयास्पद स्थितीत आढळून आला. या कारवाईमध्ये तब्बल २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. पाटील आणि सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. नागरिकांना शुध्द आणि भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी ही मोहीम जिल्हाभर अधिक व्यापक स्वरूपात राबविली जात असून, अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागरिकांना कोणत्याही खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास त्यांनी तत्काळ अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी केले आहे.