रामकथा म्हणजे भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य ठेवा - ढोक महाराज

संगमनेर Live
0
रामकथा म्हणजे भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य ठेवा - ढोक महाराज

◻️ गुंजाळवाडीत दुसऱ्या पुष्पातील रामकथेच्या भक्तीरसात चिंब झाले भाविक!

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे प. पू. स्वामी गगनगिरी महाराज यांच्या सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित रामकथेने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या ओघवत्या वाणीतून रामकथेची दिव्य गंगोत्री वाहत असून, भाविक या भक्तीच्या अमृतधारेत न्हाऊन निघत आहेत. यावेळी सौ. शालिनीताई विखे पाटील आणि सौ. नीलम खताळ देखील उपस्थित होत्या.

​रामराव ढोक महाराज यांनी दुसऱ्या दिवसांचे पुष्प गुंफताना आपल्या निरूपणातून रामकथेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, रामकथा ही केवळ एका स्थळापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण भारतवर्षाच्या आध्यात्मिक परंपरेचा अमूल्य ठेवा आहे. याज्ञवल्क्य-भारद्वाज, शिव-पार्वती आणि काकवशुंडी-गरुड संवादाच्या माध्यमातून ही कथा पिढ्यानपिढ्या मानवासाठी मार्गदर्शक ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.

​कथेच्या दुसऱ्या दिवशी ढोक महाराजांनी रामायणातील पात्रांचे आध्यात्मिक स्वरूप स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, दशरथ म्हणजे वेद, कौसल्या म्हणजे ज्ञानशक्ती, सुमित्रा म्हणजे उपासना आणि कैकयी म्हणजे क्रियाशक्ती होय. रामकथेचा खरा भावार्थ समजून घेण्यासाठी केवळ कथा श्रवण न करता, तिचे चिंतन करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.

​राजा शीलनिधी, विश्‍वमोहिनी विवाह सोहळा आणि सीतामाईंच्या जन्माच्या कथेने भाविकांना मंत्रमुग्ध केले. विशेषतः श्रावण बाळाच्या अद्वितीय मातृ-पितृभक्तीची कथा सांगताना महाराजांच्या वाणीतील करुण रसाने वातावरण अत्यंत भावूक झाले. आपल्या माता-पित्यांना खांद्यावर घेऊन निघालेल्या श्रावण बाळाची ही कथा ऐकून अनेक भाविकांचे डोळे पाणावले.

​भगवान रामांच्या जन्मप्रसंगाचे वर्णन करताना अयोध्येतील आनंदोत्सव उपस्थितांसमोर साकार झाला. ‘राजाराम, रामराम, सीताराम’ अशा जयघोषाने गुंजाळवाडी परिसर दुमदुमून गेला. समारोपप्रसंगी रघुनाथांच्या आणि प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांच्या आरतीने वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता पसरली.

दरम्यान, ​अधिकमासाच्या पवित्र पर्वात रामकथा श्रवणाची ही दुर्मिळ संधी कोणत्याही परिस्थितीत दवडू नका, असे आवाहन ढोक महाराजांनी शेवटी भाविकांना केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !