गगनगिरी महाराज धर्ममंडप बनले संस्कारांचे विद्यापीठ - ढोक महाराज
◻️ रामकथेचे चौथे पुष्प गुंफताना ‘दांडके मंडळ’ स्थापन करण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातील रामकथेच्या आठव्या पर्वात रामायणाचार्य ढोक महाराज यांनी आपल्या भावस्पर्शी निरूपणातून उपस्थितांना भक्तीच्या अमृतधारेत न्हाऊ घातले. प. पू. गगनगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने उभे राहिलेले हे धर्ममंडप केवळ एक कार्यक्रम नसून ते संस्कार, भक्ती आणि अध्यात्माचे विद्यापीठच बनले असल्याचे प्रतिपादन ढोक महाराज यांनी केले.
रामकथेच्या विविध पैलूंचे विवेचन करताना ढोक महाराज म्हणाले की, “कैकेयीच्या वरामुळे प्रभू रामांना वनवास भोगावा लागला आणि त्या वियोगाने राजा दशरथांनी अन्नत्याग केला, हा प्रसंग अतिशय वेदनादायी आहे. रामकथेतील चौथा दिवस हा वियोगाचा असतो.” हा प्रसंग उलगडताना सभागृहातील अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.
विवाहातील अनावश्यक खर्च, दिखाऊपणा आणि वधूपित्याला सहन करावा लागणारा मानसिक त्रास यावर महाराजांनी परखड शब्दांत टीका केली. समाजातील ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी गावागावांत ‘दांडके मंडळ’ स्थापन करून शिस्त राखण्यासाठी युवकांची पथके उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या आध्यात्मिक सोहळ्याला गोविंददेवगिरी महाराज, श्री जंगली सदगुरू महाराज यांच्यासह अनेक संत-महात्म्यांची विशेष उपस्थिती लाभली. संत दर्शनाने हा सोहळा अधिक तेजस्वी व चैतन्यमय झाला असून, त्यातून भाविकांना सदाचाराचा अमूल्य संदेश मिळत असल्याचे महाराजांनी नमूद केले. तसेच, रामकथेच्या प्रसारासाठी संगमनेरच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
दरम्यान, अधिक मासातील ज्येष्ठ कृष्ण कमला एकादशीच्या निमित्ताने आयोजित महाप्रसादाचा लाभ संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर तालुक्यातील सुमारे ४५ हजार भाविकांनी घेतला. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी गगनगिरी महाराज सप्ताह समितीने विशेष परिश्रम घेत आहे.