शरद पवार कधीही प्रतिगामी विचार स्वीकारणार नाहीत - बाळासाहेब थोरात
◻️ लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | “भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसची विचारधारा एकच आहे. लोकशाही, राज्यघटना, संत आणि बहुजनांचा पुरोगामी विचार जोपासणारी ही विचारधारा आहे. ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब कधीही प्रतिगामी विचारधारा स्वीकारणार नाहीत,” असे स्पष्ट मत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना थोरात यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “सध्याची लढाई ही विचारधारेची आहे. देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. न्यायव्यवस्थेवर असलेला दबाव, पत्रकारितेची घसरलेली विश्वासार्हता आणि निवडणूक आयोगाची स्थिती पाहता, लोकशाही मानणाऱ्या सर्व समविचारी पक्षांनी देश वाचवण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे."
सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना थोरात यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “प्रत्येक क्षेत्रात काही प्रमाणात दोष असतात, पण आता राजकारणात आणि सरकारमध्ये केवळ दोषच शिल्लक राहिल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने, आता दोष शोधण्यापेक्षा ‘चांगले' शोधण्याची वेळ आली आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे."
यावेळी “जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प जो थांबला आहे, तो पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे," असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.