‘रामायण’ केवळ ग्रंथ नव्हे, तर जगण्याची प्रेरणा - ढोक महाराज
◻️ रामकथेच्या चौथ्या पुष्पातील रसाळ निरूपणाने भाविक मंत्रमुग्ध
संगमनेर LIVE | प्रभू श्रीराम हे एकवचनी, एकबाणी आणि एकपत्नी या आदर्श तत्त्वांचे मूर्तिमंत प्रतीक असून त्यांचे जीवन संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. आज्ञापालन आणि वचनासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे चरित्र मानवी जीवनातील दुःख, व्यथा आणि संभ्रम दूर करण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे आयोजित प. पू. गगनगिरी महाराज सप्ताहात रामकथेचे चौथे पुष्प गुंफताना ढोक महाराज बोलत होते. अधिक मासातील या आठव्या पर्वाच्या सहाव्या भागात महाराजांनी आपल्या रसाळ आणि भावपूर्ण शैलीने रामायणातील प्रसंग जिवंत केले.
चित्रकूट, केवट भेट, भरत मिलाप आणि राम वनवास यांसारख्या प्रसंगांचे वर्णन करताना श्रोते तल्लीन झाले होते. केवट प्रसंगाचे महत्त्व सांगताना त्यांनी भक्ती आणि साधनेचा महिमा अधोरेखित केला, तर भरताचा त्याग आणि कौसल्येचे राजसिंहासनासाठीचे अनुमोदन यांतील वैश्विक विचारधारा त्यांनी सोप्या भाषेत उलगडून दाखवली.
रामकथेचा संदेश समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या प्रसारमाध्यमांचे महाराजांनी विशेष कौतुक केले. पत्रकार, डॉक्टर आणि आचारी यांसारख्या समाजहितैषी कार्य करणाऱ्या व्यक्तींना विनाकारण विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी भाविकांना केले. समाजप्रबोधनात या घटकांचे योगदान मोठे असून त्यांच्याबद्दल आदराची भावना ठेवणे समाजाच्या हिताचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
रामकथेच्या श्रवणासाठी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. ढोक महाराजांनी थोरात यांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “ढोक महाराजांचे दर्शन आणि त्यांच्या मुखातून रामकथा श्रवण करणे म्हणजे अमृतपान करण्यासारखे आहे. त्यांची विद्वत्ता आणि ओजस्वी वाणी ही दैवी देणगी आहे.” थोरात यांनी महाराजांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. तसेच, शेतकरी सुखी तर समाज सुखी, असे सांगत शेती हा देशाच्या जीवनचक्राचा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
दरम्यान, या सोहळ्याला तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.