संगमनेर एसटीच्या ताफ्यात ५ अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या परिवहन मंत्र्याकडील पाठपुराव्याला यश
संगमनेर LIVE | ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी संगमनेर एसटी आगाराच्या ताफ्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ' बसेस दाखल झाल्या आहेत. आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या बसेस संगमनेरकरांच्या सेवेसाठी तातडीने उपलब्ध झाल्या आहेत. या नवीन बसेसचे लोकार्पण आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आमदार अमोल खताळ यांनी स्वतः चालक कक्षात बसून स्टेअरिंग हातात घेतले. निमोण नाका प्रवासादरम्यान त्यांनी बसेसमधील आसनव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांसाठीच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि बसची एकूण कार्यक्षमता यांची प्रत्यक्ष पाहणी केली. आमदारांचा हा आगळावेगळा अनुभव उपस्थितांसाठी चर्चेचा विषय ठरला.
याप्रसंगी बोलताना आमदार खताळ म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी ही केवळ वाहतुकीची सेवा नसून ती एक जीवनवाहिनी आहे. प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास मिळावा, यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. नवीन बसेसमुळे संगमनेर आगाराच्या सेवेची गुणवत्ता नक्कीच उंचावेल.”
दरम्यान, या सोहळ्याला संगमनेरचे आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या बसेसमुळे आपला प्रवास अधिक सुखकर आणि सोयीस्कर होणार असल्याची भावना संगमनेरकरांनी व्यक्त केली आहे.