बाळासाहेब थोरातांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला दिला पाठिंबा
◻️अलनिनोचे संकट आणि निवडणुकीतील आश्वासने यावरून सरकारला फटकारले
संगमनेर LIVE | शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. सरकारने या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून न पाहता शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन थोरात यांनी केले आहे.
निवडणूक काळात सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आणि सातबारा कोरा करण्याचे मोठे आश्वासन दिले होते. मात्र, दीड वर्ष उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सध्या जाहीर केलेली कर्जमाफी अत्यंत तुटपुंजी असून, त्यात जाचक अटी लादल्या गेल्या आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांना मदतीची नितांत गरज आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळाची आठवण करून देताना थोरात म्हणाले की, आम्ही पहिल्याच कॅबिनेट बैठकीत दोन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान दिले होते. सरकारने सध्याच्या संकटाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याच्या मागणीचा प्राधान्याने विचार करावा.
सध्या अलनिनोमुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे नमूद केले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असून, सरकारने तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.