पेरणीपूर्वी सोयाबीनची ‘उगवण चाचणी’ करा - शैलेश देशमुख
◻️ उत्पादन वाढीसह दुबार पेरणीचा धोका टाळण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांना सल्ला
संगमनेर LIVE (लोणी) | खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते, परंतु अनेकदा शेतकरी घरगुती किंवा बाजारातून आणलेले बियाणे थेट पेरणीसाठी वापरतात. जर बियाण्यांची उगवण क्षमता कमी असेल, तर अपेक्षित रोपसंख्या मिळत नाही, ज्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा नाहक भुर्दड सोसावा लागतो. हे टाळण्यासाठी पेरणीपूर्वी ‘उगवण क्षमता चाचणी' करणे अत्यंत आवश्यक असल्याचे बाभळेश्वर येथील कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी सांगितले.
बियाणे तपासण्यासाठी शेतकरी तीन सोप्या पद्धतींचा वापर करू शकतात. यामध्ये पहिली पध्दत म्हणजे गोणपाट पध्दत, ज्यामध्ये ओले गोणपाट पाण्यात भिजवून त्यावर १०० बियाणे १० ओळींत मांडावेत आणि ४-५ दिवसांनी कोंब फुटलेल्या बियाण्यांची मोजणी करावी. दुसरी पध्दत म्हणजे पाणी पध्दत, ज्यात ग्लास किंवा भांड्यात १०० बियाणे ४-५ मिनिटे पाण्यात बुडवून ठेवावीत आणि बाहेर काढल्यानंतर ज्या बियाणांच्या बाह्य अंगावर सुरकुत्या पडल्या आहेत, ते उगवणक्षम समजावे.
तिसरी पध्दत म्हणजे माती पध्दत, ज्यामध्ये सच्छिद्र ट्रेमध्ये माती भरून त्यात १०० बियाणे पेरावीत आणि त्यावर १-२ सेंटीमीटर मातीचा थर देऊन ८-१० दिवसांत उगवलेल्या बियाणांची संख्या मोजावी. उगवण क्षमतेनुसार पेरणीचे नियोजन करताना, जर बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर प्रत्येक एक टक्का कमी क्षमतेसाठी एकरी अर्धा किलो बियाणे वाढवून पेरावे. मात्र, ६० टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे टाळावे.
याशिवाय, पेरणीपूर्वी बियाण्याला शिफारशीनुसार बुरशीनाशक व जैविक बीजप्रक्रिया केल्यास रोगांपासून संरक्षण मिळते. पावसाची पूर्ण खात्री झाल्यानंतर आणि जमिनीत पुरेसा ओलावा असतानाच पेरणी करावी. पेरणीपूर्व या लहानशा नियोजनामुळे उत्पादन खर्च कमी होऊन सोयाबीनचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास कृषि विज्ञान केंद्राने व्यक्त केला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड होत असल्याने, भरघोस उत्पादनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, डॉ. उत्तमराव कदम, डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाभळेश्वर कृषि विज्ञान केंद्र मार्फत शेतकऱ्यांना खरीप हंगामाची माहिती नियमित दिली जाते.