“ठेकेदारांसाठी काम करताय की जनतेसाठी?” - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
“ठेकेदारांसाठी काम करताय की जनतेसाठी?” - मंत्री विखे पाटील 

◻️ अकोले प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पालकमंत्र्याचा संताप; अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

संगमनेर LIVE (​अकोले) | पाणी टंचाईसारख्या अत्यंत गंभीर प्रश्नावर अकोले तालुक्यातील प्रशासन पूर्णपणे निष्क्रीय असल्याचे दिसून येत आहे. “अधिकारी सरकारसाठी नाही तर ठेकेदारांसाठी काम करत आहेत का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले. अकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते.

​अकोले हा आदिवासी तालुका असून येथे टंचाईच्या काळात अधिकाऱ्यांनी विशेष संवेदनशीलता दाखवणे अपेक्षित आहे. मात्र, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी ते ग्रामसेवक यांपैकी कुणालाही टंचाईबाबतची वस्तुस्थिती सांगता येत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसताना प्रशासनाला त्याचे काहीच गांभीर्य वाटत नाही, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली आणि यापुढे असा निष्क्रीय कारभार खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा दिला.

​बैठकीत पाणीपुरवठा नियोजनावर भर देताना पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, टंचाईच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून गावपातळीवर अधिक प्रभावी नियोजन करावे आणि टॅकरच्या नियोजनाबाबत वस्तुस्थितीशी सुसंगत माहिती सादर करावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा कारभार बोगस असून त्यांच्याकडून कामात सातत्याने विलंब होत असल्याचेही निदर्शनास आले. त्यांनी ३२ गावे, एक दरी आणि शमशेरपूर यांसारख्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेत, अपूर्ण कामांसाठी संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच, देवठाण पाणीपुरवठा योजनेतील तक्रारी आणि लहीत खुर्द येथील पाझर तलावाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत सविस्तर चौकशी करण्याचे निर्देशही दिले.

​यावेळी मवेशी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेत, या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.

याशिवाय, महायुतीतील कार्यकर्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याची सूचना करत, जे अधिकारी कार्यकर्त्यांना जुमानणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, आदिवासी भागातील शासकीय योजनांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्ध्तीने होणे आवश्यक असून, यापुढे प्रत्येक विभागाचा स्वतंत्र आढावा घेऊन कामांच्या प्रगतीचे नियमित परीक्षण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ​या बैठकीला आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !