वटपौर्णिमेनिमित्त सौ. नीलम खताळ यांच्याकडून दोन हजार फळझाड रोपांचे वाटप
◻️ पेमगिरी येथील ऐतिहासिक स्वराज्य संकल्पभूमीवर भव्य महिला सन्मान सोहळा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'उत्सव माझ्या कुंकवाचा' कार्यक्रमात हजारो महिलांनी वटवृक्षाला सात फेरे मारून 'जन्मोजन्मी हाच पती लाभो' अशी प्रार्थना केली. यावेळी सौ. नीलम अमोल खताळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
ऐतिहासिक व स्वराज्य संकल्पभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेमगिरी येथे जाकमत बाबा मित्र मंडळ, आदिशक्ती फाउंडेशन आणि शिवसेना महायुती यांच्या संयुक्त विद्यमाने हा आगळावेगळा महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ यांच्यासह रीलस्टार वृषाली गुंजाळ, जादूगार रिया कानवडे, महिला तालुकाध्यक्ष सुनीता कानवडे, कविता पाटील, आरती सातपुते व शीतल खताळ यांच्या हस्ते महिला सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वटवृक्षाच्या पूजेसाठी आलेल्या प्रत्येक महिलेला पेरू, आवळा, आंबा आदी विविध फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. सुमारे दीड ते दोन हजार रोपांचे वितरण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात निमगाव पागा येथील जादूगार रिया कानवडे यांनी सादर केलेल्या जादूच्या प्रयोगांनी महिलांना मंत्रमुग्ध केले. तसेच माधुरी गुंजाळ व मच्छिंद्र बिडवे यांनी सुमधुर गीतांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यावर आधारित गीतही गायक मच्छिंद्र बिडवे यांनी सादर केले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी गुंजाळ यांनी केले, तर आभार अर्चना वनपत्रे यांनी मानले. धार्मिक परंपरा, महिला सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुंदर संगम घडविणारा हा वटपौर्णिमा सोहळा पेमगिरी परिसरातील महिलांसाठी संस्मरणीय ठरला.
“पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाला हजारो महिलांनी सात फेरे मारून सात जन्म हाच पती लाभावा, अशी प्रार्थना केली. वडाच्या वृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो. त्यामुळे पतीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना करण्यात आली. याचबरोबर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या दीर्घायुष्यासाठीही मी वटवृक्षाची पूजा करून प्रार्थना केली.” असे सौ. नीलम खताळ म्हणाल्या आहेत.