पुणे-नाशिक रेल्वे प्रश्नासाठी मंगळवारी महत्वपुर्ण बैठक - आमदार अमोल खताळ
◻️ उद्या विधान भवनात मंत्री विखे पाटलांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन
संगमनेर LIVE | नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेच्या प्रश्नाबाबत जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व लोकप्रतिनिधीची बैठक विधान भवनात आयोजित केली असल्याची माहीती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
प्रस्तावित पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग पहील्या आराखड्या प्रमाणे संगमनेर-देवठाण मार्गे जावा आशी मागणी लोकप्रतिनिधी तसेच जनतेची आहे. यासंदर्भात वेळोवेळी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. यापुर्वी मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत बैठक घेवून याप्रश्नाबाबत सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गाबाबत रेल्वे विभागाच्या कार्यालयात मंत्री विखे पाटील यांच्या सूचनेवरून आपणही बैठक घेवून सर्व माहीती जाणून घेतली होती. तसेच संगमनेर, अकोले तालुक्यातील जनतेच्या भावना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या.
प्रस्तावित रेल्वे मार्ग संगमनेर-देवठाण मार्गे जावा या मागणीने पुन्हा जोर धरला असून, पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरवा करण्याच्या दृष्टीने मंगळवारी विधान भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत या प्रश्नाबाबत शासनास उपाय सुचविण्याच्या दृष्टीकोनातून निर्णय होतील असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.