मुळा साखर कारखान्यावर माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे निर्विवाद वर्चस्व
◻️१८ जागा बिनविरोध तर, चार जागा मोठ्या फरकाने जिकल्या
संगमनेर LIVE (नेवासा) | मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या ‘सहकार पॅनल’ने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले आहे. विरोधी ‘स्वाभिमानी शेतकरी पॅनल’ला नमवत गडाख गटाने कारखान्यावर आपली मजबूत पकड कायम राखली आहे.
या निवडणुकीत एकूण २१ जागांसाठी चुरस अपेक्षित होती, परंतु आमदार विठ्ठलराव लंघे आणि उद्योगपती प्रभाकर शिंदे यांच्या स्वाभिमानी शेतकरी पॅनलला सर्व जागांसाठी सक्षम उमेदवार उभे करता न आल्याने १८ जागांवर गडाख गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर उर्वरित जागांसाठी झालेल्या मतदानातही सहकार पॅनलच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.
शुक्रवारी झालेल्या मतदानात एकूण १६,९४१ सभासदांपैकी ८,३९५ सभासदांनी म्हणजेच ४९.५५ टक्के सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शनिवारी नेवासा येथे झालेल्या मतमोजणीनंतर करजगाव गटातून चंद्रकांत टेमक आणि डॉ. ज्ञानेश्वर दरंदले, तर महिला राखीव गटातून कमल दहिफळे आणि विमल सोनवणे हे विजयी घोषित करण्यात आले.
या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सोनई गटातून वसंत कुसळकर, छाया भुसारी व दिनकर घावटे, घोडेगाव गटातून लक्ष्मण पांढरे, एकनाथ जगताप व दत्तात्रय बऱ्हाटे, तर खरवंडी गटातून बापूसाहेब शेटे, भाऊसाहेब मोटे व सोपान विरकर यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त नेवासा गटातून बाळासाहेब भणगे व त्रिंबक सुकाळकर, प्रवरासंगम गटातून बाळासाहेब पाटील व पांडुरंग निपुंगे, सहकारी संस्था मतदारसंघातून शंकरराव गडाख, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून शंकर कदम, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून भाऊसाहेब भालके आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातून बाळासाहेब परदेशी हे देखील बिनविरोध संचालक म्हणून निवडून आले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी सुधीर पाटील यांनी अत्यंत शांततेत आणि शिस्तबध्द पध्दतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निकालाची घोषणा होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि जल्लोष साजरा केला.
दरम्यान, या विजयामुळे नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रावर माजी मंत्री शंकरराव गडाख यांची असलेली पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.