पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पावर राजकीय आरोपबाजी नको!
◻️ आमदार अमोल खताळ यांचे सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासारख्या महत्त्वाकांक्षी आणि जनतेच्या विकासाशी निगडित विषयावर राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबवून सर्वांनी एकदिलाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. कॅमेऱ्यासमोर एक आणि पडद्यामागे दुसरी भूमिका घेऊन जनतेची दिशाभूल करू नका, असा रोखठोक इशारा संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांना दिला आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार खताळ यांनी प्रकल्पाच्या गतीसाठी सर्वपक्षीय एकतेची हाक दिली.
आमदार खताळ म्हणाले, “पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प हा अहिल्यानगर, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक परिसराच्या सर्वांगीण विकासाचा कणा आहे. हा प्रकल्प कोणत्याही एका पक्षाचा किंवा नेत्याचा नसून सामान्य जनतेच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग आहे. 'रेल्वे संगमनेरवरून पळवली' असे निराधार आरोप करून प्रकल्पाला गती मिळणार नाही, उलट अशा नकारात्मकतेमुळे प्रकल्पाचे नुकसान होत आहे.”
या प्रकल्पासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सुरुवातीपासून मोठा पाठपुरावा केला आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा आदर व्यक्त करत आमदार खताळ यांनी, “जर आढळराव पाटील यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व केले, तर त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने काम करण्यास आम्ही तयार आहोत,” अशी सकारात्मक तयारी दर्शवली.
राज्य सरकार या प्रकल्पाबाबत पूर्णपणे सकारात्मक असल्याचे सांगताना आमदार खताळ यांनी माहिती दिली की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वेमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. तसेच, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील या प्रकल्पाच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, पुणे-नाशिक रेल्वेचे स्वप्न साकार करण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी केंद्र सरकारकडे भक्कम पाठपुरावा करणे हीच काळाची गरज आहे, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांना केले आहे.