युवकांनी पुढे येऊन ‘नशामुक्त भारत' मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा - मंत्री विखे पाटील
◻️ ‘युवा शक्ती जागर’ यात्रा शिर्डीत दाखल; व्यसनमुक्त समाजाचा संकल्प
संगमनेर LIVE (शिर्डी) | “देशाची युवा शक्ती ही बौद्धिक आणि ऊर्जासंपन्न आहे. देशाच्या सामाजिक व्यवस्थेला पोखरणाऱ्या अंमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी युवकांनी पुढे येऊन ‘नशामुक्त भारत' मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने आयोजित ‘युवा शक्ती जागर' यात्रा शुक्रवारी शिर्डीत दाखल झाली. यावेळी आयोजित मेळाव्यात मंत्री विखे पाटील बोलत होते. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा राज्यभरात राबविली जात आहे.
मंत्री विखे पाटील म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभर अंमली पदार्थ विरोधी मोहीम छेडली आहे, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कडक धोरण अवलंबले आहे. आज भारत हा तरुणांचा देश म्हणून जगात ओळखला जातो. मागील बारा वर्षांत स्टार्ट-अप, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून युवकांना मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हा आता डिफेन्स उद्योगाचे केंद्र बनत असून, आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नात युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे.”
सरकारने घेतलेले निर्णय आणि राबविलेल्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी युवा मोर्चाच्या खांद्यावर आहे. विकासकामांची योग्य माहिती पोहोचली, तरच समाजात वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना आळा बसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांनी सांगितले की, “तरुणांना राष्ट्रीय विचारांशी जोडणे आणि राज्याच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक परंपरांची माहिती करून देणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांचा संदेश युवकांपर्यंत पोहोचवून त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हे आमचे ध्येय आहे.”
दरम्यान, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, सरचिटणीस अशोक पवार, युवा मोर्चा उत्तर जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, नगराध्यक्षा सौ. जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके आणि शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.