संगमनेरचे सुपुत्र डॉ. संतोष खेडलेकर यांना ‘कुसुमाग्रज फेलोशिप’ जाहीर
◻️ लोककलेच्या संशोधनावर शिक्कामोर्तब; तमाशाच्या बदलत्या स्वरूपावर होणार संशोधन
संगमनेर LIVE | नाशिक येथील ख्यातनाम ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान'च्या वतीने सन २०२६-२७ या वर्षासाठीची प्रतिष्ठित ‘कुसुमाग्रज फेलोशिप' (अभ्यासवृत्ती) संगमनेर महाविद्यालयातील पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. संतोष खेडलेकर यांना जाहीर झाली आहे. मराठी साहित्यात आणि संशोधनात मोलाचे योगदान देणाऱ्या अभ्यासकांना दिली जाणारी एक लाख रुपये मूल्याची ही फेलोशिप डॉ. खेडलेकर यांच्या तीन दशकांच्या अभ्यासू प्रवासाची पावती मानली जात आहे.
डॉ. संतोष खेडलेकर हे गेल्या तीस वर्षांपासून तमाशा आणि इतिहास या विषयांचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. १९७५ ते २०२५ या ५० वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या ‘तमाशा' या लोककलेत झालेले आमुलाग्र बदल आणि त्यामागील सामाजिक-सांस्कृतिक कारणमीमांसा, यावर डॉ. खेडलेकर हे या फेलोशिपच्या माध्यमातून सखोल संशोधन करणार आहेत.
या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. संतोष खेडलेकर म्हणाले की, “१९७५ नंतरच्या काळात तमाशाच्या स्वरूपात मोठे बदल झाले आहेत. या बदलांचा शास्त्रशुध्द अभ्यास होणे काळाची गरज होती. कुसुमाग्रज प्रतिष्ठानने माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्यासाठी मी कटिबध्द असून, वर्षभरात हे संशोधन पूर्ण करून ते पुस्तकरूपाने रसिकांच्या भेटीला आणण्याचा माझा मानस आहे.” असे नमूद केले.
डॉ. खेडलेकर यांच्या निवडीवेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश होळकर, सहकार्यवाह अॅड. राजेंद्र डोखळे, कोषाध्यक्ष अॅड. दत्तप्रसाद निकम, विश्वस्त डॉ. दिलीप धोंडगे आणि सल्लागार मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर, तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे.