पानोडी ग्रामस्थ पाणीटंचाईमुळे हैराण!
◻️ परिसरात मुबलक पाणीसाठा, पण नळाला पाणी येईना?
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पानोडी गावातील ग्रामस्थांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाच्या हद्दीतून निळवंडेचा कालवा भरून वाहत असतानाही, गावठाणातील सामान्य नागरिकांना हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एकीकडे पाणीटंचाईची भीषणता असताना दुसरीकडे गावात पाण्याचा अपव्यय होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील नळ पाणीपुरवठ्यात मोठा तफावत आहे. काही विशिष्ट प्रभागांमध्ये मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे, तर दुसरीकडे अनेक प्रभागांमधील नळांना पाणीच मिळत नाही. पाणी वितरणातील या दुजाभावामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता, अधिकारी आणि कर्मचारी समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मार्च महिन्यात ग्रामपंचायतीने पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवली होती. मात्र, या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाला असून केवळ २० ते ३० टक्के नागरिकांनीच पाणीपट्टी भरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कर न भरणाऱ्यांनाच मुबलक पाणी मिळत असून, कर भरूनही नियम पाळणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तसेच पाणी उपसा २४ तास सुरू असेल, तर ग्रामस्थांना पाणी का मिळत नाही? गावठाण परिसरात केवळ एकाच वेळी पाणी का सोडले जाते? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा त्रास लक्षात घेता, ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, पाणीपट्टी भरणे बाकी असलेल्या नागरीकांनी ती जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.