आश्वी परिसरात झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल?
◻️ वनविभाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील बागायती पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याने ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. लिंब, चिंच, जांभूळ यांसारखी वर्षानुवर्षे उभी असलेली झाडे आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने काही मिनिटांत भुईसपाट केली जात असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच वनविभाग याकडे करत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण मोहिमा राबवत आहे, तर दुसरीकडे आश्वी परिसरात भरदिवसा झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. लाकडाने भरलेली वाहने दिवसाढवळ्या ये-जा करत असतानाही संबंधित यंत्रणा मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे.
मागील महिन्यात झालेल्या वादळात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अनेक झाडे जमीनदोस्त झाली होती. मात्र, या झाडांचे लाकूड नेमके कुठे गेले? याचा पंचनामा किंवा पारदर्शक हिशोब अद्याप समोर आलेला नाही. काही ठिकाणी पडलेल्या लाकडाबाबत अनियमितता झाल्याचा गंभीर संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
खाजगी जमिनींवरील काही झाडे आवश्यक परवानग्या न घेताच तोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक अधिकारी आणि लाकूड तस्कर यांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोप नागरीकांकडून केला जात आहे.
दरम्यान, पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या या वृक्षतोड रॅकेटची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमीं नागरिकांनी केली आहे.