लाचखोर महावितरण कर्मचाऱ्याला एसीबीचा ‘हाय-व्होल्टेज’ झटका!
◻️ समनापूर येथील घटना; कारवाईची भीती दाखवून मागीतली ५० हजारांची लाच
संगमनेर LIVE | हॉटेलवरील कथित वीज चोरीच्या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संगमनेर आणि निंबाळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे समनापूर येथे हॉटेल आहे. हॉटेलला वीज पुरवठा करणाऱ्या डी. पी. मध्ये बिघाड झाल्याने त्यांनी जवळच्या दुसऱ्या डी. पी. वरून वीज कनेक्शन घेतले होते. त्यामुळे महावितरणचे बाह्यस्त्रोत कर्मचारी गणेश दातीर आणि श्री. मेखे यांनी हॉटेलवर धाड टाकली. “तुम्ही वीज चोरी केली असून तुमच्यावर कारवाई होईल,” अशी भीती दाखवून ती टाळण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
पीडित तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती. तक्रारीची दखल घेत विभागाने सापळा रचला. पडताळणी दरम्यान गणेश दातीर याने तक्रारदाराकडे स्वतःसाठी व मेखे यांच्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे पंचासमक्ष उघड झाले.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपूटे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल वैभव सुपेकर, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हारुन शेख यांच्या पथकाने यशस्वी केली.
दरम्यान, या प्रकरणी शुक्रवार दि. ५ जून २०२६ रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५६७/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे लोकसेवक गणेश दातीर यांच्यावर गुन्हा दाखल करत, त्याला ताब्यात घेतले आहे.