कौटुंबिक एकोपा आणि संस्कारातच राष्ट्राची अखंडता - रामराव ढोक महाराज
◻️ प. पू. गगनगिरी महाराज सप्ताहात राम कथेतेचे पहिले पुष्प गुंफले
संगमनेर LIVE | “अखंड भारतवर्षात रामायण माहित नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. रामायण ही केवळ ऐतिहासिक घटना नसून ती प्रत्येक कुटुंबाच्या जीवनाचा आरसा आहे. मानवी जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर रामायणात दडलेले आहे. जर आपल्याला देशाची अखंडता टिकवायची असेल, तर त्याची सुरुवात आपल्या घरातील, कुटुंबातील आणि समाजातील एकतेतून व्हायला हवी,” असे मौलिक मार्गदर्शन रामराव ढोक महाराज यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे प. पू. स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित रामकथेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
रामायणातील बंधुप्रेमाचा आदर्श मांडताना ढोक महाराज म्हणाले की, आजच्या समाजाला भावा-भावांमधील प्रेमाची सर्वाधिक गरज आहे. ज्या घरात प्रेम, आपुलकी आणि एकोप्याचे वातावरण असते, त्या घरातील आई-वडिलांना कोणत्याही औषधाची गरज भासत नाही. त्यांनी आपल्या रसाळ वाणीतून उपस्थितांना कौटुंबिक नात्यांचे महत्त्व पटवून दिले.
शिव-पार्वती विवाहाच्या कथेचा संदर्भ देऊन ढोक महाराज यांनी सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. “पद वाईट नसते, पण पदाचा अहंकार वाईट असतो,” असा संदेश त्यांनी दक्ष प्रजापतीच्या कथेच्या माध्यमातून दिला. तसेच त्याग, समर्पण आणि कुटुंब व्यवस्थेतील स्त्रीचे महत्त्व अधोरेखित केले.
रामचरितमानसाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, “मानसरोवरात डुबकी मारल्यानंतर ज्याप्रमाणे आनंद मनात साठवून ठेवला जातो, तसाच अनुभव संतवाणीतून मिळवला पाहिजे.” यावेळी त्यांनी वीरभद्र, कार्तिकस्वामी आणि श्रीगणेश जन्मकथांचा उल्लेख करत रामकथेचे जिवंत चित्र उभे केले. पती-पत्नींनी एकत्र बसून कथा श्रवण केल्यास कुटुंबातील नाती अधिक दृढ होतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, या सोहळ्याच्या निमित्ताने संगमनेर आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेतली. रामकथेच्या माध्यमातून धार्मिकतेसोबतच सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि संस्कारांची शिदोरी घेऊन भाविक घरी गेले.