नुकसान होऊनही संगमनेरचे शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित
◻️ आमदार अमोल खताळ यांची, थेट कृषिमंत्र्याकडे धाव
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या आणि फळबागांच्या नुकसानीनंतरही, पात्र शेतकरी अद्याप पीकविमा लाभापासून वंचित आहेत. या गंभीर विषयावर आमदार अमोल खताळ यांनी आक्रमक भूमिका घेत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन तातडीने पीकविमा रक्कम जमा करण्याची मागणी केली आहे.
गेल्या खरीप हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मका, भाजीपाला तसेच डाळिंब आणि द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले होते. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत पीकविमा जमा झाला असताना, संगमनेर तालुक्याला वितरण प्रक्रियेतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, आगामी हंगामाच्या तयारीवरही याचा विपरीत परिणाम होत आहे.
आमदार अमोल खताळ यांनी यापूर्वीही कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासकीय पातळीवरील दिरंगाई आणि विमा कंपनीच्या टाळाटाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. “सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही विमा रक्कम जमा न होणे ही गंभीर बाब आहे,” असे म्हणत आमदार खताळ यांनी पीकविमा वितरण प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबध्द आहे. पीकविमा वितरण प्रक्रियेतील ही दिरंगाई अजिबात सहन केली जाणार नाही. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा व्हावी, यासाठी माझा पाठपुरावा शेवटपर्यंत सुरूच राहील.” असे नमूद केले आहे.