घरकुल अनुदानासाठी पैसे उकळणारा ‘सात्रळ’चा लिपिक एसीबीच्या जाळ्यात!

संगमनेर Live
0
घरकुल अनुदानासाठी पैसे उकळणारा ‘सात्रळ’चा लिपिक एसीबीच्या जाळ्यात!

◻️ लिपिक, ग्रामविकास अधिकारी आणि अभियंत्यावर गुन्हा दाखल

संगमनेर LIVE (​राहुरी) | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून देण्यासाठी आणि अनुदानाचे हप्ते वेळेत मिळवून देण्याच्या बदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सात्रळ ग्रामपंचायतीच्या कंत्राटी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत लाचलुचपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला होता. सन २०२३ मध्ये त्यांना घरकुल मंजूर झाले असून, यापूर्वी त्यांना अनुदानाचे दोन हप्ते मिळाले होते. मात्र, पुढील हप्ता मंजूर करण्याच्या प्रक्रियेत मदत करण्याच्या बदल्यात सात्रळ ग्रामपंचायतीचा कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे याने ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल व पंचायत समितीचे गृहनिर्माण अभियंता सचिन ब्राम्हणे यांच्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची दखल घेत बुधवारी (३० जून २०२६) एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. यावेळी आरोपी हैदर पटेल आणि ज्ञानदेव डुकरे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचलेल्या सापळ्यात आरोपी ज्ञानदेव डुकरे हा तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात सापडला. यावेळी आरोपी अभियंता सचिन ब्राम्हणे याने लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे उघड झाले आहे.

ही धडक कारवाई लाचलुचपत विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर एसीबीच्या पोलीस निरीक्षक श्रीमती सविता तांबे आणि पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ व दशरथ लाड यांच्या पथकाने पार पडली.

दरम्यान, ​या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे करत आहेत. तर, राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !