अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यांचे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार
◻️ पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच व्हावा यासाठी आमदार खताळ आग्रही
संगमनेर LIVE | पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्याबाबतच्या चर्चेने निर्माण झालेली परिस्थिती आणि प्रकल्पाच्या मार्गाबाबत होत असलेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत अत्यंत आक्रमक आणि ठाम भूमिका मांडली आहे. हा रेल्वे मार्ग नियोजित सरळ मार्गानेच झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
मुंबई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील जनतेच्या भावना आणि प्रकल्पाचे महत्त्व अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले.
आमदार अमोल खताळ यावेळी म्हणाले की, “पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा केवळ वाहतुकीचा मार्ग नाही, तर तो उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा कणा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर आणि आंबेगाव या परिसरातील उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प मूळ सरळ मार्गानेच पूर्ण करणे ही काळाची गरज आहे.” असे नमूद केले.
या बैठकीत सर्व संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मते ऐकून घेण्यात आली. या विषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आणि प्रकल्पाच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी, लवकरच तिन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
दरम्यान, “संगमनेर तालुक्याच्या विकासाचा हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल. आपल्या हक्काची रेल्वे मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सरळ मार्गावरील जनतेच्या न्याय्य मागणीसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल.” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.