पीकविमा निष्काळजीपणाची सखोल चौकशी करा - आमदार अमोल खताळ
◻️ पावसाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांची कृषीमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
संगमनेर LIVE (मुंबई) | खरीप हंगाम २०२५ मध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे होरपळलेल्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. या गंभीर विषयावर आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधले. प्रशासकीय त्रुटी आणि विमा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी हक्काच्या मदतीपासून वंचित असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले.
खरीप हंगाम २०२५ दरम्यान संगमनेर तालुक्यात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले होते. अनेक शेतकऱ्यांनी नियमानुसार विमा हप्ते भरले होते. मात्र, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आजवर पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नैसर्गिक संकटानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर हा दुहेरी अन्याय असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
या प्रकरणात दोषी असलेल्या कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार खताळ यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. तसेच, विमा कंपनीला त्वरित निर्देश देऊन संगमनेरच्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात पीकविम्याची रक्कम जमा करावी, असा आग्रह त्यांनी धरला.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करत असून, तालुक्यातील एकाही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आता सरकार यावर नेमकी काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना न्याय कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.