महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर आजचे ‘रास्ता रोको’ आंदोलन स्थगित
◻️ शेतकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून भेडसावणाऱ्या वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बहुतांश मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिल्यानंतर आज बुधवारी (दि. १ जुलै) नियोजित असलेले मांचीहिल फाट्यावरील ‘रास्ता रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
सोमवारी (दि. २९ जून) सायंकाळी मांचीहिल येथे माजी पंचायत समिती सदस्य सरुनाथ उंबरकर आणि महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी संगमनेरचे उप कार्यकारी अभियंता मंगेश प्रजापती, जोर्वे विभागाचे सहायक अभियंता ए. आर. मेखे, आश्वी विभागाचे सहायक अभियंता ए. एस. विखे आणि सहायक अभियंता संदीप सोनार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते किशोर जऱ्हाड, ओझर येथील रामभाऊ थोरात, उंबरी बाळापूर येथील अण्णासाहेब सारबंदे, जनार्दन उंबरकर, संतोष उंबरकर, शिवा भुसाळ, बाबासाहेब भुसाळ आदिंसह पंचक्रोशीतील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेवेळी वीज कंपनीने शेतीसाठी दिवसा सहा तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी दीड महिन्याची मुदत मागितली असून, वरंवडी येथील सौर ऊर्जा प्रकल्प ते आश्वी सबस्टेशन लाईन कार्यान्वित होताच शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.
त्याचबरोबर गावठाण भागाला २४ तास सिंगल फेज अखंडित वीज पुरवठा देण्यासही कंपनीने नैसर्गिक आणि तांत्रिक व देखभाल दुरुस्ती अडचणी वगळता सहमती दर्शवली आहे. तर, जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून बाभळेश्वर ते आश्वी मुख्य लाईन आणि सबस्टेशनसाठी आवश्यक त्या साधन व यंत्र सामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू. अशी ग्वाही सरुनाथ उंबरकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिली आहे.
दरम्यान, या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य झाल्याने आणि उर्वरित मागण्या १५ ऑगस्टपूर्वी सोडवण्याचे ठोस लेखी आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले आहे. मात्र, जर या आश्वासनांची पूर्तता वेळीचं झाली नाही, तर थेट १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मांचीहिल फाट्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा सरुनाथ उंबरकर यांनी दिला आहे.
वीज वितरण कंपनीचे नागरीकांना आवाहन..
वीज वितरण कंपनीने तांत्रिक ताण कमी करण्यासाठी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत शेगड्या, चापकटर, सिंगल फेज मोटर यांचा वापर न करण्याबरोबरचं जास्त वीज लागणाऱ्या उपकरणांचा वापर कमी करण्याचे आवाहन नागरीक आणि शेतकऱ्यांना केले आहे.