२७ हजार कामगारांना मिळालेला लाभ ५० हजारांपर्यंत नेण्याचा प्रयत्न - आमदार अमोल खताळ
◻️२१ प्रकारच्या कामगारांना विविध योजनांचा लाभ; दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत केवळ गवंडीच नव्हे, तर बांधकाम क्षेत्राशी संबंधित २१ प्रकारच्या कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जात आहे. या योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबध्द असून, सध्या २७ हजार कामगारांना मिळालेला हा लाभ ५० हजारांपर्यंत नेण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर येथे आयोजित कार्यक्रमात बांधकाम कामगारांना भांडी संच आणि त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वाटप आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महायुतीचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते याच्यासह कामगार आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी आमदार खताळ यांनी कामगारांना दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. “कोणत्याही लाभार्थ्याने अर्ज करण्यासाठी एजंट किंवा दलालाची मदत घेऊ नये. दलालांमार्फत आलेल्या अर्जांना मंजुरी दिली जाणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, जर कोणी कामासाठी पैशांची मागणी करत असेल, तर त्यांनी त्वरित भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईन १०६४ वर तक्रार करावी किंवा माझ्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन केले.
आमदार खताळ यांनी मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेताना सांगितले की, साकूर पठार उपसा सिंचन योजना आणि तळेगाव-निमोण परिसरातील भोजापूर चारीसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. कवठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहत उभारली जाणार असून, त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच, कामगार रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालयालाही मंजुरी मिळाली असून, पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र व राज्य पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
महायुती सरकार सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत आहे. २०१९ मधील कर्जमाफीतील त्रुटी दूर करून वंचित शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. कामगारांच्या हक्काचा लाभ कोणताही राजकीय भेदभाव न करता पोहोचवला जाईल, अशी ग्वाही आमदार खताळ यांनी दिली.
दरम्यान, याप्रसंगी बांधकाम अधिकारी स्वप्निल जाधव यांनी बांधकाम कामगारांच्या नावावर पैसे उकळणाऱ्या एजंट किंवा दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल. असे स्पष्ट केले.