वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा योजना’ - नामदार विखे पाटील
◻️ अपघाती मृत्यू झाल्यास ४ लाखांची मदत; तर जखमींनाही मिळणार तातडीचे आर्थिक साहाय्य
संगमनेर LIVE (लोणी) | पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी महायुती सरकारने ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२६' राबविण्याचा निर्णय केला असून, वारीच्या दरम्यान अपघात किंवा कोणत्याही दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
सदर योजनेचा कालावधी ७ जुलै ते २५ जुलै २०२६ असा ठेवण्यात आला असून, वारीच्या कालावधीत अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू आल्यास संबंधित वारकऱ्याच्या वारसदारास ४ लाख रुपयांची आर्थिक मदत महायुती सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. सदर योजना आषाढी वारी २०२६ करिता असून, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खासगी किंवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी लागू राहील, असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
वारी दरम्यान काही घटना घडल्यास या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित वारकरी वारीसाठी पंढरपूरला गेल्याबाबतचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. योजनेचे अनुदान मंजूर आणि वितरित करण्याचे सर्व अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, वारसदाराने अर्जासोबत जोडलेल्या तहसीलदारांच्या प्रमाणपत्राची तसेच वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणी करून, आपत्तीग्रस्त वारकऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
"वारी दरम्यान अपघात होऊन ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार रुपये, तर ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार रुपये देण्याची तरतूद तसेच एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यास १६ हजार रुपये आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी करिता रुग्णालयात दाखल असल्यास ५ हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून वारकऱ्यांना केली जाणार आहे."