तालुक्यासाठी ७०० टन युरिया खत उपलब्ध; साठेबाजी करणाऱ्यावर कारवाई होणार
◻️ आमदार अमोल खताळ यांनी घेतला कृषी विभागाचा आढावा
संगमनेर LIVE | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. तालुक्यासाठी ७०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला असून, त्यातील ३५० मेट्रिक टन खत तातडीने विक्रीसाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या किंवा चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.
खरीप हंगामात युरियाची वाढती मागणी लक्षात घेता, शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी (दि. १३ जुलै) कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक झाली. या बैठकीत उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडखे, पंचायत समिती कृषी अधिकारी उघडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आमदार खताळ यांनी बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, कोणत्याही शेतकऱ्याला युरियासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. तालुक्याला टप्प्याटप्प्याने खताचा साठा मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी घाई किंवा घबराट करू नये. खताच्या वितरण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
“खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणे किंवा जादा दराने विक्री करणे, हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रवृत्तींविरोधात कोणतीही तडजोड न करता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा खणखणीत इशारा आमदार खताळ यांनी दिला. तसेच शेतकऱ्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करून केवळ गरजेनुसारच खत खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, शासनाच्या या नियोजनामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, खताचा पुरवठा सुरळीत राहण्याबाबत प्रशासनाकडून खात्री देण्यात आली आहे.