सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार!

संगमनेर Live
0
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार!

◻️ डॉ. विखे पाटील यांची ​गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली करण्याची ग्वाही 

संगमनेर LIVE (​शिर्डी) | नगर-मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे सुरू असलेल्या रस्ते आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या तीन दिवसांत या भागातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

डॉ. विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन आणि परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवटापासून बायपासच्या सुरुवातीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करून ती वाहतुकीसाठी खुली केली जाईल, तर दुसरी बाजू मोटरेबल ठेवली जाईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीत येणारी सर्व अतिक्रमणे, ज्यामध्ये काही मंदिरे आणि टपऱ्यांचाही समावेश आहे, ती दोन दिवसांत स्वेच्छेने हटवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही अतिक्रमणे हटविण्यात येतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

धुळीच्या समस्येबाबत बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, टिकाऊ आणि दर्जेदार रस्ता निर्मितीसाठी प्रशासनाला काही तांत्रिक मर्यादा आहेत. घाईने काम केल्यास रस्ता खचण्याचा धोका असतो, त्यामुळे कामाच्या दर्जाशी तडजोड केली जाणार नाही. तसेच, संबंधित ठेकेदारावर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

यावेळी त्यांनी दूध भेसळविरोधी कारवाईबाबतही भाष्य केले. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, परंतु प्रशासनाने कारवाई करताना सखोल पडताळणी करावी, जेणेकरून कोणत्याही निर्दोष दूध उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, असे त्यांनी नमूद केले. तसेच, अलीकडच्या काळात या कारवायांना मिळत असलेल्या अति प्रसिध्दीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, ​या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या विकासकामांमुळे काही काळ होणारा त्रास सहन करून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !