सात्रळ सबस्टेशनवर शेतकरी आणि ग्रामस्थांचे धरणे आंदोलन
◻️ वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने पंचक्रोशीतील वीजग्राहक आक्रमक
संगमनेर LIVE (सात्रळ) | राहुरी तालुक्यातील सात्रळ सह पंचक्रोशीतील शेतकरी आणि वीजग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या अनियमित आणि विस्कळीत वीजपुरवठ्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, सात्रळ ३३/११ केव्ही सबस्टेशनच्या आवारात किरण कडू यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलकांनी महावितरणच्या डेप्युटी इंजिनियर पाटील आणि अतिरिक्त इंजिनियर गाढे यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निवेदनाद्वारे सात्रळ सबस्टेशनसाठी तात्काळ पूर्णवेळ अभियंत्याची नियुक्ती करावी, शेतीसाठी दिवसा सलग ८ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा मिळावा, सात्रळ सबस्टेशनचे कार्यालय गावात स्थलांतरित करावे आणि नियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा खंडित करायचा असल्यास तो आठवड्यातून केवळ एकदाच आणि पूर्वसूचना देऊन करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. वारंवार विनाकारण वीजपुरवठा खंडित करणे त्वरित थांबवावे, असेही निवेदनात नमूद केले आहे.
आंदोलनादरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मागण्यांवर ठोस आणि समर्पक उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निर्धार आंदोलकांनी केला आहे. तसेच, यापुढे नियमित व पूर्ण दाबाने वीजपुरवठा न मिळाल्यास पंचक्रोशीतील नागरिक घरगुती वीज बिले भरणार नाहीत आणि महावितरणला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनात किरण अंत्रे, सीताराम दिघे, अमोल दिघे, युनूस इनामदार, दानिश तांबोळी, बलराज डुक्रे, अवधूत चोरमुंगे, दिलीप सिनारे, परशुराम साबळे, नरेंद्र कडू, बापूसाहेब दिघे, अण्णासाहेब अनाप, संभाजी कडू, हर्षल कडू, संजय निधाने, सागर डुकरे, कैलास पडघलमल, अण्णा अनाप, योगेश पडघलमल, दत्तात्रय पडघलमल, हरिभाऊ सिनारे, अन्वर इनामदार, शब्बीर इनामदार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.