दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ अकोलेत उत्स्फूर्त ‘शैक्षणिक बंद’
◻️ हजारो विद्यार्थ्यांची रॅली; केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
संगमनेर LIVE (अकोले) | जंतर-मंतर (दिल्ली) येथे झालेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी शैक्षणिक बंदला अकोले तालुक्यात अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी (दि. २४) अकोले तालुक्यातील अगस्ती महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी महाविद्यालय बंद ठेवत जोरदार निदर्शने केली.
अकोले महाविद्यालय ते एसटी स्टॅड असा एक भव्य मोर्चा काढण्यात आला. या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात एसएफआय, छात्र भारती या विद्यार्थी संघटना आणि डीवायएफआय या युवक संघटनेने विशेष पुढाकार घेतला होता.
या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित नवले, विशाल शिंदे, गणेश ताजणे, सदाशिव साबळे, अच्युत वैद्य, विशाल बोऱ्हाडे, तेजस्विनी माघाडे, अवधूत नवले, श्रीपाद डावरे, शीतल झोळेकर, सुनंदा मेढे आणि युवराज भांगरे आदीनी केले.
दरम्यान, आंदोलनाचा पुढील टप्पा ठरवण्यासाठी तालुक्यातील सर्व विद्यार्थी संघटनांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अकोले शहरातील सर्व महाविद्यालाये व शाळा, तसेच कोतुळ, राजूर आणि समशेरपूर येथील सर्व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांची मोट बांधून हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.