महायुती सरकारच्या कर्जमाफी वचनाची पंढरपुरात वचनपूर्ती - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
महायुती सरकारच्या कर्जमाफी वचनाची पंढरपुरात वचनपूर्ती - मंत्री विखे पाटील

◻️ आषाढी एकादशीनिमित्त विखे पाटील कुटुंबीयांचे विठ्ठल-रुक्मिणी दर्शन!

संगमनेर LIVE (पंढरपूर) | जलसमृध्द महाराष्ट्र आणि बळीराजाकरिता अधिकचे काम करण्यासाठी बळ देण्याची प्रार्थना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूर येथे श्री पांडुरंगाच्या चरणी केली. श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे पहिले पत्र देऊन बळीराजाला दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केल्याचे त्यांनी सांगितले.

आषाढी वारीच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

परंपरेप्रमाणे संपूर्ण विखे पाटील कुटुंबीयांनी यंदाच्या वर्षीही पंढरपूर येथे जाऊन वारकरी सेवेची प्रथा कायम ठेवली. मंत्री विखे पाटील यांनी पंढरपूरमध्ये वारकरी बांधवांशी संवाद साधला. श्री क्षेत्र पंढरपूर येथे विखे पाटील परिवाराने उभारलेल्या मठामध्ये जिल्ह्यातून गेलेल्या दिंड्यांमधील वारकरी आणि भक्तांची सोय करण्यात आली, त्याचाही आढावा घेऊन गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेतली. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी मठामध्ये जाऊन वारकरी बांधवांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.

मंत्री विखे पाटील आणि सौ. शालिनीताई विखे यांनी मंदिरात जाऊन श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले. चांगला पाऊस होऊन राज्य जलसमृध्द होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करून राज्यातील बळीराजासाठी अधिकचे काम करण्यासाठी बळ देण्याचे साकडे त्यांनी विठुरायाच्या चरणी घातले.

राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि वीजबिल माफीचा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये कर्जमाफीचे पहिले पत्र बळीराजाच्या हाती सोपवून महायुती सरकारने दिलेल्या वचनाची पूर्तता केली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जमाफीची यादी लवकरच जाहीर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे सांगून पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी भक्कमपणे आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायात असलेल्या शेतकऱ्यांसाठी आषाढीच्या पावन पर्वावर महायुती सरकारकडून मोठा दिलासा मिळाला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

आषाढी वारीच्या निमित्ताने जलसंपदा विभागाने उजनी धरणातून पाणी उपलब्ध करून दिले. यंदाच्या वर्षी पावसास उशिरा सुरुवात झाली. तरीही उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन विभागाने केले.

यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना वारकरी संप्रदायासाठी अहिल्यानगर आणि सोलापूरमध्ये नियोजनाचा सुरू केलेला पॅटर्न मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने अधिक व्यापक झाल्याचे समाधान आहे. यंदाच्या वर्षीपासून दोन्ही जिल्ह्यांत वारकरी संप्रदायासाठी सुरू झालेला चरणसेवा उपक्रम अधिक महत्त्वपूर्ण ठरल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपूरमध्ये आगमन झाल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !