पाण्याचे नियोजनबध्द व्यवस्थापन हीच काळाची गरज - आमदार अमोल खताळ
◻️ जवळे कडलग येथे आमदार खताळांच्या हस्ते आढळा नदीचे जलपूजन
संगमनेर LIVE | आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे परिसरातील शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि भूजल पातळी वाढण्यास मोठा लाभ होणार असून, पाण्याचे नियोजनबध्द व्यवस्थापन केल्यास याभागात वर्षभर पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे आढळा नदीच्या पाण्याचे जलपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. जलसंपदा विभागाचे अभियंता योगेश जोर्वेकर, प्रीतम शेवाळे यांच्यासह दत्ता कडलग, वैभव नाईकवाडी, सुरेश लांडगे, हरीश चकोर, संदेश देशमुख, सुशांत कडलग, बापूसाहेब देशमुख, भाऊसाहेब साळवे, राजेंद्र देशमुख, अशोक देशमुख, बापू देशमुख, रोहिदास साबळे, संजय कडलग, कैलास आडभाई, मीनानाथ खताळ, रामा जमदाडे, विनोद सुर्वे, श्रीकांत कडलग, पोपट नाईकवाडी, शरद कदम, रोहिदास कडलग, मनोज देशमुख, अरुण देशमुख, दिलीप देशमुख, रोहिदास गुंजाळ, आशिष कानवडे आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, मागील काळात धरणातील पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने अपेक्षित लाभ मिळत नव्हता. परंतु, यंदा राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आढळा, भोजापूर आणि निळवंडे धरणांच्या पाण्याचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनामुळे गत उन्हाळ्यातही दुष्काळी परिस्थितीत शेतीसाठी आठ आवर्तने सोडण्यात आली होती, ज्यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला होता.
नदीपात्रात सोडण्यात आलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे नदीकाठच्या विहिरी, कूपनलिका आणि जलस्रोतांची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच शेतीचा ओलावा टिकून राहून भूजल पुनर्भरण होणार असल्याने आगामी काळासाठी ही अत्यंत सकारात्मक बाब ठरणार आहे. असे देखील नमूद केले.
यावर्षी हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज वर्तवला असला, तरी निसर्गाच्या कृपेने तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. यामुळे आढळा आणि भोजापूर धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर केल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि भूजल पातळीसाठी याचा वर्षभर मोठा लाभ होईल. असे देखील आमदार अमोल खताळ म्हणाले आहेत.