संगमनेरमध्ये साकारणार माजी सैनिकांसाठी भव्य स्मारक - बाळासाहेब थोरात
◻️ कारगिल विजय दिनानिमित्त सहकारमहर्षी कारखान्याकडून ४२ गुंठे जागेची घोषणा
संगमनेर LIVE | स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये देशासाठी प्राण पणाला लावणारे सैनिक हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आदराचे आणि अभिमानाचे स्थान आहेत. सीमेवर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या जवानांमुळेच देशातील नागरिक सुरक्षितपणे शांत झोपू शकतात, असे प्रतिपादन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर येथे माजी सैनिकाचे एक सुंदर स्मारक व्हावे, यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ४२ गुंठे जागा विनाशुल्क दिली जाईल, अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली.
संगमनेर येथे स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या वतीने ‘कारगिल विजय दिवस’ आणि वीरमाता, वीरपत्नी व समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात बोलत होते.
कारगिल युध्दाचा संदर्भ देत बाळासाहेब थोरात म्हणाले की, पाकिस्तानी कुरापती विरुध्द भारतीय सैनिकांनी अत्यंत प्रतिकूल व कठीण परिस्थितीत हा विजय मिळवला होता. डोंगरावर असलेल्या शत्रूशी खालील बाजूने लढावे लागल्यामुळे अनेक अडचणी होत्या; परंतु आपल्या सैनिकांच्या अदम्य साहसामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. काश्मीरसारख्या सीमाभागात ऊन, वारा, पाऊस आणि असह्य थंडीची पर्वा न करता अहोरात्र देशसेवा करणाऱ्या जवानांचे ऋण कधीही न फेडता येणारे आहेत.
पहिल्या व दुसऱ्या महायुध्दापासून ते स्वातंत्र्योत्तर काळातील पाकिस्तान व चीनविरुध्दच्या युध्दांपर्यंत भारतीय सैनिकांनी नेहमीच सर्वोच्च शौर्य गाजवले आहे. ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ मिळवणारे नामदेवराव जाधव हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अत्यंत अभिमानास्पद व्यक्ती आहेत. त्यांचे आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांचे भव्य स्मारक संगमनेरमध्ये व्हावे, यासाठी 'स्वराज्य सैनिक समिती' सातत्याने पाठपुरावा करत होती. या समितीचे कार्य वीरमाता आणि वीरपत्नींसाठी अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
कारगिल विजय दिनानिमित्त संगमनेरमध्ये विद्यार्थ्यांनी एक भव्य रॅली काढली, ज्यामध्ये “वंदे मातरम्” आणि “जय जवान, जय किसान” या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान, कार्यक्रमाच्या उत्तरार्धात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देशासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये हरिभाऊ उगले, तसेच वीरपत्नी श्रीमती वैशाली बडे, श्रीमती वर्षा घोडेकर, श्रीमती सुरेखा पवार, श्रीमती मनीषा गुंजाळ, श्रीमती मंगल वलटे, श्रीमती सिंधुताई मनसुख आणि वीरमाता लहानुबाई ढगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.