संत गाडगेबाबांच्या विचारातूनच खरी जनसेवा - अशोक पाटील
◻️ राहुरीत आईच्या स्मरणार्थ सलग तीन वर्षांपासून राबवला जातोय अनोखा उपक्रम
संगमनेर LIVE (राहुरी) | संत गाडगेबाबांनी जनसामान्यांसाठी आपले आयुष्य पणाला लावले. शिक्षणाची महती, स्वच्छता, भुकेल्यांना अन्न आणि वस्तरांविना असलेल्यांना वस्त्र देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. आज याच विचाराने चालल्यास खरी जनसेवा घडेल आणि त्यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही. असे प्रतिपादन वळण (ता. राहुरी) येथील संत गाडगेबाबा आश्रमातील अशोक पाटील यांनी केले.
पानेगाव येथील रहिवासी आणि एसटी महामंडळात श्रीरामपूर येथे कार्यरत असलेले सुनील भवार यांच्या मातोश्री साखरबाई यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त संत गाडगेबाबा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन आणि ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
सुनिल भवार हे मागील सलग तीन वर्षांपासून आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त संत गाडगेबाबा आश्रमात स्नेहभोजनाचा उपक्रम राबवत आहेत. याबद्दल कौतुक करताना अशोकराव पाटील म्हणाले की, “भवार यांचा हा आदर्श इतर दानशूरांनीही घेणे गरजेचे आहे. संत गाडगेबाबांचे विचार आत्मसात केल्यासच खऱ्या अर्थाने जनसामान्यांची सेवा घडून पुण्यरुपी आशीर्वाद प्राप्त होतात.” असे नमूद केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सुनिल भवार म्हणाले, “मी राहुरी येथील संत गाडगेबाबा आश्रमाचा विद्यार्थी असून येथे सहा वर्षे शिक्षण घेतले. गाडगेबाबांमुळेच मी घडलो आणि माझे कुटुंब उभे राहिले. म्हणूनच माझ्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त हा उपक्रम सलग तीन वर्षांपासून या आश्रमात राबवत आहे. जोपर्यंत शक्य होईल, तोपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा माझा संकल्प आहे.” अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमासाठी पानेगावचे माजी उपसरपंच डॉ. जयवंत गुडधे, प्राचार्य बी. वाय. वाघ, राजेंद्र नवगिरे, सोपान जंगले, गोवर्धन माळी, प्रविण भामरे, गोपाळ पाटील, शितल पाटील, कविता सपकाळ, जालिंदर जंगले, नामदेव पवार, विशाल भवार, पंकज आरंगळे, नामदेव शेलार, आदीनाथ जंगले, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील, प्रदिप जंगले, तानाजी घोलप, अनिल चिंधे आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पवार यांनी केले, सूत्रसंचालन मुख्याध्यापक मंगेश पगारे यांनी मानले तर आभार दत्तात्रय बर्डे यांनी मानले. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.