सावळी विहीर येथे डॉ. सुजय विखे पाटलांकडून विविध विकासकामांचा आढावा

संगमनेर Live
0
सावळी विहीर येथे डॉ. सुजय विखे पाटलांकडून विविध विकासकामांचा आढावा

◻️ कामाच्या गुणवत्तेशी तडजोड न करण्याचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश!

संगमनेर LIVE (​शिर्डी) | सावळी विहीर खुर्द येथील शैक्षणिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात त्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय, आयटीआय इमारत, एमआयडीसी परिसरातील रस्ते, गटारे आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना आवश्यक त्या कडक सूचना दिल्या.

​डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्वप्रथम सावळी विहीर खुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या राज्यातील महत्त्वाकांक्षी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची पाहणी केली. पशुवैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून पशुसंवर्धन क्षेत्रालाही नवी दिशा मिळणार आहे. त्यांनी महाविद्यालयाची मुख्य इमारत, शैक्षणिक विभाग, प्रयोगशाळा, प्रशासकीय इमारत आणि वसतिगृहाच्या बांधकामाच्या प्रगतीची अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. भविष्यात हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी संबंधित असलेल्या या प्रकल्पात उच्च दर्जाचे साहित्य वापरले पाहिजे आणि प्रत्येक काम तांत्रिक निकषांनुसार व वेळेत पूर्ण झाले पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.

​यानंतर डॉ. विखे पाटील यांनी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या आयटीआय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाचा आढावा घेतला. औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आधुनिक तांत्रिक शिक्षणाची गरज अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, या आयटीआय महाविद्यालयामुळे स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षणाची उत्तम संधी मिळेल. यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

​औद्योगिक विकासासाठी सातत्यपूर्ण आणि पुरेसा पाणीपुरवठा अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यांनी एमआयडीसी परिसरातील पंपिंग स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी केली. पंपिंग स्टेशनची कार्यक्षमता, यंत्रसामग्रीची स्थिती, भविष्यातील पाण्याची गरज आणि देखभाल व्यवस्थेचा आढावा घेत उद्योगांना कोणत्याही परिस्थितीत पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

​त्यानंतर डॉ. विखे पाटील यांनी ग्रामस्थ व अधिकाऱ्यांसह सावळी विहीर खुर्द एमआयडीसी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, सांडपाणी निचरा, वीज आणि नागरी सुविधांची पाहणी केली. पाहणीदरम्यान रस्त्यांची दुरवस्था आणि पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या निदर्शनास आल्यावर त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !