ओझर बंधाऱ्यातून प्रवरा नदी पात्रात १३ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग
◻️ ओझर बुद्रुक - ओझर खुर्दला जोडणारा जुना पूल पाण्याखाली
संगमनेर LIVE (आश्वी) | भंडारदरा आणि निळवंडे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणांमधून प्रवरा पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची 'अमृतवाहिनी' मानली जाणारी प्रवरा नदी सध्या दुतर्फा काठोकाठ भरून वाहत असून, ओझर बंधाऱ्याच्या भिंतीवरून तब्बल १३ हजार क्युसेक्सने पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. यामुळे ओझर बुद्रुक आणि ओझर खुर्द (ता. संगमनेर) या दोन महत्त्वपूर्ण गावांना जोडणारा जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. परिणामी या भागातील वाहतुक ठप्प झाली आहे.
अकोले आणि संगमनेर तालुक्यांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. परिसरातील लहान-मोठी धरणे, बंधारे व तलाव पूर्ण भरले आहेत. त्यामुळे डोंगराळ भागातील ओढे व उपनद्या उधाणून थेट प्रवरा नदीला येऊन मिळत आहेत. यामुळे नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे.
पाणीपातळी वाढल्याने प्रवरा नदीकाठा लगत असलेल्या शेतजमिनी आणि उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे बळीराजा चिंतेत सापडला असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
ओझर बंधाऱ्याच्या भिंतीवरून ओसंडून वाहणारे पांढरेशुभ्र पाणी पाहण्यासाठी परिसर आणि दूरवरून येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी जमू लागली आहे. ओझर बंधाऱ्याचे हे विहंगम व निसर्गरम्य दृश्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तसेच सोशल मीडियावर रील आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तरुणाईची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टीने पात्राजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे.
“भंडारदरा धरणातून प्रवरा पात्रात १,९०४ क्युसेक्स, निळवंडे धरणातून ७,६०५ क्युसेक्स आणि आढळा नदीतून १,२९७ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या ओझर बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवरा नदीपात्रात १३ हजार क्युसेक्स वेगाने पाणी वाहत आहे. तर, धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यास पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी केला जाईल.” अशी माहिती प्रवरा डावा कालवा सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अधिकारी योगेश घोगरे यांनी सांगितले.