सिस्पे घोटाळ्याचा मास्टरमाइंड राहुल काळोखेला फिजीमधून अटक
◻️ मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री विखे पाटलांच्या पाठपुराव्याला यश!
संगमनेर LIVE (मुंबई) | अहिल्यानगरमधील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या बहुचर्चित ‘सिस्पे घोटाळा’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि गेली अनेक दिवस फरार असलेला मास्टरमाइंड राहुल श्यामराव काळोखे याला अखेर आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणांच्या (इंटरपोल) मदतीने फिजीमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.
कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले असून, आज दुपारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. राहुल काळोखेच्या अटकेमुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या या तपासाला आता मोठी आणि निर्णायक दिशा मिळाली आहे.
तपासादरम्यान राहुल काळोखे परदेशात पसार झाल्याचे समोर आल्यानंतर तपास यंत्रणांच्या शिफारसीवरून चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात इंटरपोलने त्याच्याविरोधात 'रेड कॉर्नर नोटीस' बजावली होती. या नोटीसमुळे जगभरातील १९६ देशांमधील कायदा अंमलबजावणी व सुरक्षा यंत्रणांना काळोखेच्या शोधाबाबत अधिकृत माहिती पाठवण्यात आली होती. तो फिजी या देशात लपून बसल्याची पक्की माहिती मिळताच, तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माध्यमातून त्याच्या प्रत्यार्पणाची आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली.
ही गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय मोहीम फत्ते करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, इमिग्रेशन विभाग आणि इंटरपोल यांनी परस्पर समन्वय साधत अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली. आज दुपारी मुंबईत दाखल होताच काळोखेला अधिकृतपणे ताब्यात घेण्यात आले असून, आता त्याला पुढील चौकशीसाठी विशेष तपास यंत्रणांच्या स्वाधीन केले जाणार आहे. त्याच्या या कसून चौकशीतून घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारांचे जाळे, रकमा कुठे व कशा प्रकारे वळवण्यात आल्या, तसेच या संपूर्ण प्रकरणात सहभागी असलेल्या इतर सह-आरोपींची नेमकी भूमिका आणि घोटाळ्याची खरी व्याप्ती उघडकीस येण्याची बळकट शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी थेट समन्वय साधून आवश्यक स्तरावर पत्रव्यवहार करत तपास प्रक्रियेला गती मिळवून दिली. केंद्र आणि राज्य यंत्रणांमधील याच प्रभावी समन्वयामुळे आरोपीचा माग काढून त्याला भारतात आणणे शक्य झाले आहे.
दरम्यान, सिस्पे घोटाळ्यामुळे अहिल्यानगरसह राज्यभरातील हजारो सामान्य गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे अडकले होते. आता या मुख्य आरोपीच्या अटकेमुळे बुडलेले पैसे परत मिळतील आणि न्यायाची प्रक्रिया वेगाने पुढे जाईल, अशी आशा पीडित गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली असून संपूर्ण राज्याचे लक्ष या पुढील तपासाकडे लागले आहे.