संगमनेरच्या ग्रामीण भागात ‘अंधारा’चे संकट; महावितरण कार्यालयावर मोर्चा

संगमनेर Live
0
संगमनेरच्या ग्रामीण भागात ‘अंधारा’चे संकट; महावितरण कार्यालयावर मोर्चा 

◻️ युवक काॅग्रेसच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलनाचा इशारा

​संगमनेर LIVE | संगमनेर शहरासह ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या भारनियमनाच्या नावाखाली सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या अनियंत्रित वीज कपातीमुळे संतप्त झालेल्या नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आज संगमनेर येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. संगमनेर तालुका युवक काॅग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात काॅग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

​सध्या दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाळी दिवसांमुळे लवकर अंधार पडत असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वेळेतच वीज नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, शिवाय अंधारात शाळेतून घरी परतताना विद्यार्थ्यांना हिंस्र प्राण्यांच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना गोठ्यातील स्वच्छता आणि दुधाची काढणी यासारखी कामे अंधारात करावी लागत असल्याने त्यांची मोठी ओढाताण होत आहे, तर कमी दाबाच्या आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे स्थानिक व्यापारी व उद्योजकांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

​महावितरण प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन सायंकाळच्या वेळेत वीज कापण्याचे धोरण त्वरित थांबवावे आणि अखंडित वीज पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे. जर या समस्येवर तातडीने तोडगा निघाला नाही, तर आगामी काळात जनतेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

दरम्यान, महावितरणचे कार्यकारी अभियंता वट्टमवार यांनी हे निवेदन स्वीकारले असून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. आता महावितरण आपल्या आश्‍वासन किती खरे उतरते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का?, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !