व्हाट्सअप ग्रुपला श्रध्दांजली वाहून माजी सरपंच संदीप घुगे यांच्यावर गोळीबार
◻️ मालुंजे येथे तलवारीने घराच्या खिडक्या आणि दरवाजाची तोडफोड
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावचे माजी सरपंच आणि भाजपचे पदाधिकारी असललेले संदीप घुगे यांच्यावर बुधवारी रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुरुम वाहतुकीच्या वादातून काही तरुणांनी घराबाहेर गोंधळ घालत घुगे यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि तलवारीने घराची तोडफोड केली. विशेष म्हणजे या धक्कादायक घटनेआधी व्हाट्सअप ग्रुपला संदीप घुगे यांना श्रध्दांजली वाहिल्यानतंर हा सर्व प्रकार घडल्याने परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि. १ जुलै २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संदीप घुगे आपल्या घरी असताना, दोन मोटारसायकलींवरून सहा जण तिथे आले. यामध्ये विशाल खेमनर, प्रवीण पुणेकर, सुदर्शन श्रीराम आणि त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांचा समावेश होता.
मुरुम वाहतुकीच्या वादातून या सहा जणांनी घुगे यांच्या घरासमोर येऊन जोरदार गोंधळ घातला. यावेळी विशाल खेमनर आणि प्रवीण पुणेकर यांनी आपल्याकडील पिस्तुलातून घुगे यांच्या दिशेने रोखत गोळ्या झाडल्या. त्यानंतर सुदर्शन श्रीराम आणि इतर साथीदारांनी तलवारीने घराचे दरवाजे व खिडक्यांची तोडफोड केली. मात्र, यातून संदीप घुगे हे बालंबाल बचावले असून याप्रसंगी घरात त्यांचे संपूर्ण कुटुंब होते. यावेळी हल्ल्यादरम्यान आरोपींनी घुगे यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यानी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. तसेच घटनास्थळी ठस्से तज्ज्ञांना बोलावून पुरावे संकलित करण्याचे काम केले.
गुरुवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीसांना तपासाच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
संदीप घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात विशाल खेमनर (रा. अंभोरे, ता. संगमनेर), प्रवीण पुणेकर व सुदर्शन श्रीराम (दोघे रा. डिग्रस, ता. संगमनेर) आणि त्यांचे तीन अनोळखी साथीदाराविरुध्द भारतीय न्याय संहिता गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७१/२०२६ नुसार कलम १०९, ३५१(२) ३५२, ३२४(६) ३२९ , ३(५) आणि आर्म ॲक्ट ३/२५, ४/२५, ५/२७ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे स्वतः या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. तर, हल्लेखोर पसार झाले असून, त्यांना पकडण्यासाठी पोलीसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, अंभोरे गावातील एका व्हाट्सअप ग्रुपवर संदीप घुगे यांना श्रध्दांजली वाहणारी पोस्ट टाकण्यात आली होती. व्हाट्सअप पोस्ट गोळीबारीच्या घटनेआधी टाकली होती की नंतर? याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. तर, हा हल्ला केवळ मुरुम अथवा गौण खनिज वाहतुकीच्या वादातून झाला आहे की त्यामागे इतर काही वैयक्तिक किंवा राजकीय कारणे आहेत, याची माहिती पोलीसांच्या सखोल तपासानंतरच समोर येणार आहे.